संत नगाजी महाराज यांची वैचारिक कार्य ज्योत तेवत ठेवणार! 

204

आरमोरीकर नाभिक बांधवांनी केला निर्धार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): संत नगाजी महाराज यांच्या सामाजिक ,सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याची वैचारिक ज्योत तेवत ठेवणार असल्याची भीष्मप्रतिज्ञा आरमोरी तालुक्यातील समस्त नाभिक बांधवांनी यावेळी केली.

नाभिक समाज संघटना तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली चे वतीने आरमोरी शहरातील कोसा प्रकल्प कार्यालयासमोरील नाभिक समाजाच्या नियोजित परिसरात संत नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा दिनांक १९ आॅक्टोंबर २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.

नाभिक समाजात संत पदाला पोहोचलेला एक महामानव निर्माण होणे व सदैव मानवी कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेणे हेही नसे थोडके!त्यामुळे अशा संतत्व लाभलेल्या महाषुरुषाच्या स्मृती सदैव चिरकाल टिकविण्यासाठी प्रत्येक नाभिक समाज बांधवांच्या कुटुंबांपर्यंत व इतर समाजात त्यांच्या कल्याणाकारी विचारांचा जागर करण्यासाठी, नाभिक समाज या पुण्यतिथी सोहळ्यातून प्रेरणा घेऊन आजच्या आधुनिक काळात ते महत्कार्य ज्योत तेवत ठेवणार असल्याचे सुतोवाच नाभिक मंडळाने याप्रसंगी केले आहे.

कार्यक्रमाचे स्थळी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्यास समाजातील युवकांनी पुढाकार घेत रक्तदान केले.रक्तदात्या युवक व नागरीकांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.भजन मंडळींनी संत नगाजी महाराज यांचे स्वरचित अभंग सुरेख आवाजात गायले.तसेच गोपाळकाला फोडून प्रसादाचे वितरण केले.

यावेळी कार्यक्रमाला डॉ.जयेश पापडकर, शैलेंद्र कावळे,अशोक मेश्राम तसेच बहुसंख्य स्त्री, पुरुष, युवक व समाज बांधव उपस्थित होते.

विविध समाज संघटनांनी घेतले संतांचे दर्शन व केले विनम्र अभिवादन

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील सुप्रसिद्ध वारकरी संप्रदायातील, जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरी जिल्हा गडचिरोली चे अध्यक्ष महेश तितीरमारे, उपाध्यक्ष भुवनेश्वर सेलोकर, सचिव विलास गोंदोळे, कार्याध्यक्ष राहुल तितीरमारे, संचालक मधुकरराव राघोर्ते, सहसचिव अंकुश गाढवे, तसेच संत नामदेव महाराज शिंपी समाजाचे चंदु वडपल्लीवार,संत रविदास महाराज चर्मकार समाजाचे पदाधिकारी विनायक पेलणे,महेश पेलणे तसेच निखिल सहारे व विविध समाज संघटनांचे पदाधिकारी आदींनी भेट देऊन पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन केले.त्याचप्रमाणे उपस्थित अतिथींनी संत नगाजी महाराज यांच्या कार्यावर वैचारिक प्रबोधन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाभिक संघटनेचे अध्यक्ष कालिदास लक्षणे यांनी केले.तर आभार अॅड.किशोर चोपकार यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नानाजी चोपकार, अरुण चोपकार, गणेश फुलबांधे, नामदेव पोहणकर,मंगेश न्युप्रतवार, सचिन फुलबांधे, दादाजी वनस्कर, अतुल चोपकार चेतन मेश्राम, दिनेश फुलबांधे,अनंता मेश्राम, निलकंठ सुर्यवंशी, अतुल लक्षणे, हेमराज सुर्यवंशी,सुशिल वनस्कर तसेच नाभिक समाजातील बहुसंख्य स्त्री, पुरुष युवक व युवतींनी, समाज बांधवांनी सहकार्य केले.