विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली ): दरवर्षी प्रमाणे यंदाही 8 डिसेंबर, सोमवारला संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणेगाव येथील तेली समाज संघटनेच्या वतीने जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी सोमवारला सकाळी प्रथम घर व परिसर स्वच्छ करून घरासमोर रांगोळी टाकुन सजावट करण्यात येईल. त्यानंतर दहा वाजता तेली समाज बांधवांची भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. शोभायात्रेत विविध संतांच्या वेशभूषा साकारण्यात येणार आहेत. प्रथम ग्रामपंचायत रंगमंच येथे एकत्र येऊन मिरवणूकीला सुरुवात होईल. मिरवणूक प्रथम नवीन ठाणेगाव येथे जाईल. त्यानंतर तिथुन ठाणेगाव जुने येथे येऊन पौराणिक हेमांडपंथी शिवमंदिर ते कार्यक्रम स्थळी मिरवणूकीचा समारोप होईल. यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात येईल. त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन होईल.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, ठाणेगावच्या सरपंच वर्षा मडावी, पोलिस पाटील उत्तम पेंदाम, आरमोरीचे माजी सरपंच बुधाजी किरमे, प्रा. गंगाधर जुवारे, सौ. वंदना जुवारे, आरमोरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल सोमनकर, मिलिंद खोब्रागडे, राहुल जुवारे, द्वारकाप्रसाद सातपुते, विलास चिलबुले इत्यादी उपस्थित राहतील.
त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास ठाणेगाव परिसरातील नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे तेली समाज संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
फोटो साभार: गुगल









