विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली ): श्री दत्त मंदिर देवस्थान आरमोरी (बर्डी ) यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवार,८ डिसेंबर २०२४ पासून ते मंगळवार,१४ डिसेंबर पर्यंत देवस्थानाचे भव्य पटांगणावर अखंड श्रीमद् दत्त चरित्र भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सप्ताहात भागवताचार्य ह.भ.प. अशोक वलथरे महाराज आपल्या संपूर्ण संचासहीत अमोघ ब्रम्ह वाणीतून श्री दत्त भगवंतावर प्रवचन पुष्प गुंफणार आहेत.
याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.यात ८ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता घटस्थापना, दैनिक कार्यक्रमांमध्ये सकाळी ७ वाजता श्री दत्तांचे अभिषेक, सायंकाळी हरिपाठ तसेच ह.भ.प.सौ.सुनिताताई वलथरे यांच्या सुश्राव्य वाणीतून रात्रो ९ ते ११ वाजताचे दरम्यान भागवत प्रवचन, दिनांक १४ डिसेंबरला सकाळी ७ वाजता पालखी सोहळा तर दुपारी १२ वाजता गोपाळकाला भागवताचर्य व भाविक जनता जनार्दन व मंडळ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडेल.तसेच सायंकाळी भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास आरमोरी,बर्डी व परिसरातील भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून परमानंदाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सौ.लक्ष्मीताई मने,पदाधिकारी, संचालक व दत्त जयंती उत्सव विविध समित्यांचे पदाधिकारी आदींनी आवाहन केले आहे.









