साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

248

अंनिस शाखा आरमोरीचा पुढाकार

मान्यवरांनी व्यक्त केले विचार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी दि.२आॅगस्ट,(जिल्हा गडचिरोली): अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा आरमोरीचा वतीने नुकतीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आरमोरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते रणजित बनकर, विभाताई बोबाटे, अंनिस शाखा आरमोरीचा अध्यक्ष सुनिता तागवान, कार्याध्यक्ष शिल्पा मेश्राम, उपाध्यक्ष योजना मेश्राम, कोषाध्यक्ष उषा मेश्राम, रेश्मा रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व प्रथमतः उपस्थित मान्यवरांनी साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच सामाजिक कार्यकर्त्यां, शिक्षिका सुजाता अवचट यांनी ‘जग बदल घाव घालून, मज सांगून गेले भीमराव’ हे गीत गायन करून आदरांजली वाहिली .

याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना विलास गोंदोळे म्हणाले की, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात बदल घडविण्यासाठी दीड दिवसाच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे अतुलनीय व्यक्तिमत्व होते. अण्णाभाऊ साठे यांनी हयातभर वंचित ,शोषित, दलित, पीडित, कामकरी, कष्टकरी या वर्गांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे देश विदेशातही आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाज क्रांती घडवून आणली. यावेळी त्यांनी अण्णा भाऊ साठे व शिष्टमंडळ यांच्या रशिया दौऱ्यातील अविस्मरणीय प्रसंग सांगितला.आजच्या तंत्रज्ञानात च्या युगातील युवा पिढीने त्यांचा आदर्श अंगीकारून आपली विकासाकडे वाटचाल करावी व भविष्य उज्वल करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

तसेच सामाजिक कार्यकर्ते रणजीत दादा बनकर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे बालपण व जीवनकार्य यावर प्रकाश टाकला.सामाजिक कार्यकर्ते विभाताई बोबाटे यांनी अण्णाभाऊ साठे यांची गोरगरीब जनता याविषयी असणारी तळमळ व कृतीप्रवणता सांगीतली.सुप्रसिद्ध कवयित्री ,साहित्यिक सुनीता तागवान यांनी अण्णाभाऊ साठे यांचे अफाट साहित्यिक कार्य विशद केले .

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडा व छक्कड तसेच इतर साहित्य प्रकारातून जनजागृती केली. ही जनजागृती सदैव अजरामर ठेवण्यासाठी यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिज्ञा घेतली.

कार्यक्रमाचे सुरेख संचालन शिक्षिका सुजाता अवचट यांनी केले तर आभार उषा मेश्राम यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेश्राम कुटुंबीय यांनी अथक परिश्रम घेतले.