विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी दि.१२ आॅगस्ट २०२४: नागरिकांना रानभाज्यांची ओळख व्हावी, त्यांचे आहारातील महत्त्व व औषधी गुणधर्माबाबत जनजागृती व्हावी व अशा रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकरी, शेतकरी गट व महिला बचत गट यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे यासाठी 2020-21 पासून दरवर्षी कृषी विभाग व आत्मा यंत्रणेद्वारे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव 13 ऑगस्ट 2024 रोजी तहसील कार्यालयाचे सभागृह, आरमोरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या, फळे यांचा समावेश होतो. परंतु फास्ट फूडचे या जमान्यात भाज्या व फळांची जागा पिझ्झा, बर्गर, पास्ता यांनी घेतली आहे. परंतु शेतशिवारात, माळरानात किंवा जंगलात उगवणाऱ्या अनेक वनस्पतींचा वापर जुन्या पिढीत भाजी म्हणून केला जात असे. या भाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या उपलब्ध या संपत्तीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व अधिकाधिक लोकांना माहिती होणे व शहरी भागातील नागरिकांच्या आहारात त्यांचा समावेश होणे आवश्यक आहे.
तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये अधिकाधिक शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट यांनी सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आरमोरी यांनी केले आहे.








