खासदार डॉ.नामदेव किरसान यांची प्रमुख उपस्थिती
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व इतर सामाजिक संस्थाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून दिनांक २१ जून २०२५ रोजी योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहून योग प्रात्यक्षिके केली. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करतांना खासदार डॉ. किरसान म्हणाले, “योगामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून सखोल ज्ञानाची प्राप्ती होते. योग ही केवळ व्यायामपद्धती नसून एक जीवनशैली आहे, जी दीर्घायुष्य व समाधान देणारी ठरते.”
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते .तर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे होते . प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, शहर अध्यक्ष सतीश विधाते आदी उपस्थित होते.
विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहून योगाचे प्रात्यक्षिक केले.
योग प्रशिक्षक अंजली कुळमेथे आणि मिलिंद उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासने व प्राणायामाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.









