तळागाळातील कलावंतांच्या उध्दारासाठी अहोरात्र प्रयत्न करणार

386

 

सारिका उराडे यांचे प्रतिपादन 

 

आरमोरी येथे कलावंत मार्गदर्शन मेळावा 

 

विधायक दीपस्तंभ न्यूज 

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): गडचिरोली जिल्ह्यात विविध कला अवगत असलेले व कसलेले कलाकार आहेत.मात्र आजही अनेक कलावंत उपेक्षित आहेत.त्या तळागाळातील कलावंतापर्यंत पोहचून त्यांच्या उध्दारासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष सारिका उराडे यांनी केले.

 

त्या आरमोरी येथील श्री दुर्गा माता मंदिराच्या सभागृहात महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती आरमोरी तालुका तर्फे आयोजित कलावंत मार्गदर्शन मेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

 

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे राज्य पदाधिकारी रविंद्र उमाटे, यशवंत उराडे, गडचिरोली जिल्हा सचिव उमेष हर्षे, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे, जेष्ठ कलावंत केवळराम हरडे, शंकरराव सातव

आदी उपस्थित होते.

 

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पुरूष कलावंत मंडळीप्रमाणेच स्त्री कलावंत मंडळीही आहेत.परंतु त्या प्रकाशझोतात येत नाहीत.तसेच कलावंतांना शासकीय विविध योजनांची माहिती नसते.त्यामुळेही ते अनेक योजनांपासून वंचित राहतात.खरे कलावंत शासकीय योजनांपासून उपेक्षित राहू नये.त्यांचे कल्याण व्हावे.यासाठीच आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत राहणार असल्याचे सांगितले.

 

याप्रसंगी कलावंत संस्थाचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी रविंद्र उमाटे यांनी संविधानाच्या माध्यमातून कलावंतांना मिळत असलेले विविध अधिकार व योजना यांची माहिती दिली.तर विधायक दीपस्तंभ न्यूज चे संपादक विलास गोंदोळे यांनी झाडीपट्टीतील हिरे माणिकासारखे असलेले; परंतु परिस्थितीने गांजलेले, दुर्लक्षित कलावंताची व्यथा मांडली.तसेच उपाययोजना ही सुचविल्या.

 

प्रास्ताविकात कलावंत संस्थेचे गडचिरोली जिल्हा सचिव उमेष हर्षे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भजन, कीर्तन, प्रवचन,दंडार,नाटक, तमाशा, संगीत नृत्य, संगीत नाटक व हरहुन्नरी कलाकार यांचा लेखाजोखा मांडला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती आरमोरी तालुका अध्यक्ष रामभाऊ धोटे केले.तर आभार संस्थेच्या आरमोरी तालुका महिला अध्यक्ष चंदाताई राऊत यांनी मानले.

 

यशस्वीतेसाठी आरमोरी तालुक्यातील स्त्री, पुरुष कलावंत आदींनी सहकार्य केले.

 

कार्यक्रमाला आरमोरी तालुक्यातील आष्टा,जोगीसाखरा,वासाळा,वघाळा, पळसगाव व आरमोरी शहरातील स्त्री, पुरूष बहुसंख्य कलावंत आदींनी हजेरी लावली होती.