आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन
आरमोरी येथे रानभाजी महोत्सव उत्साहात
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली)/दि.१३ आॅगस्ट २०२४:मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या, फळे यांचा समावेश होतो. परंतु शेतशिवारात, माळरानात किंवा जंगलात उगवणाऱ्या अनेक वनस्पतींचा वापर जुन्या पिढीत भाजी म्हणून केला जात असे. या भाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या उपलब्ध या संपत्तीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व अधिकाधिक लोकांना माहिती होणे व शहरी भागातील नागरिकांच्या आहारात त्यांचा समावेश होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
यावेळी महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) तसेच उमेद यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे दिनांक 13 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार कृष्णाजी गजबे, तर अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) बसवराज मास्तोळी हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी महेश परांजपे, तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम, नायब तहसीलदार ललितकुमार लाडे, सामाजिक कार्यकर्ते नंदू पेट्टेवार, मंडळ कृषी अधिकारी कु. जे. व्ही.घरत, प्रगतशील शेतकरी विलास गोंदोळे, ग्रीन गोंडवाना शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रशांत दर्वे, प्रगतशील शेतकरी मुकेश बनपुरकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र दोनाडकर, कृषी पर्यवेक्षक वसंत शेंडे, कृषी अधिकारी युगेश रणदिवे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, नागरिकांना रानभाज्यांची ओळख व्हावी त्यांचे आहारातील महत्त्व व औषधी गुणधर्माबाबत जनजागृती व्हावी. तसेच अशा रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकरी, शेतकरी गट व महिला बचत गट यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे याकरिता रानभाजी महोत्सवांचे आयोजन दरवर्षी करण्यात यावे असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी याप्रसंगी केले.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन व बिरसा मुंडा तसेच वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
महोत्सवाचे औचित्य साधून निवडक व प्रसिद्ध ४३ रानभाज्यांची ओळख असलेले रानभाजी माहिती पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात 19 शेतकरी गट, मावीम तसेच स्वयं सहायता पुरुष व महिला बचत गट यांनी रानभाजी व रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करिता उपलब्ध करण्यात आले होते. सर्व सहभागी गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम तर संचालन कृषी पर्यवेक्षक अविनाश हुकरे यांनी केले. आभार मंडळ कृषी अधिकारी कु. जे.व्ही. घरत यांनी मानले.
यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी वृदांनी व शेतकरी, महिला बचत गट आदींनी सहकार्य केले.








