समाजसुधारक संत गाडगेबाबा पुण्यतिथी विशेष

269

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

युगप्रवर्तक संत

भारत देशात अनेक संत विभूती होऊन गेले. सर्वांनी समाजाला चांगली दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक महान विभूतीं बरोबरच एक नाव मोठ्या आदराने घेतले जाते..ते म्हणजे डेबूजी झिंगराजी जानोरकर अर्थात संत गाडगेबाबा यांचे. संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे अत्यंत गरीब घरात झाला. बालपणी वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे आई त्यांना तालुका मुर्तिजापूर,दापुरे येथे मामाच्या गावी घेऊन आली. त्यांचे बालपण याच गावी गेले.
गाडगेबाबा मामाच्या घरी शेतीची कामे करीत. वयाच्या १६ व्या वर्षी त्या़चे लग्न करून देण्यात आले..संसारासाठी ते दिनरात मेहनत करीत. अशातच त्यांना एक कन्यारत्न लाभले.. परंतु १ फेब्रुवारी १९०५ ला ते रात्री घरातून बाहेर पडले ते कधीही परत न जाण्यासाठी….१२ वर्षे त्यांनी अज्ञातवासात काढले. या अज्ञातवासात त्यांना एकप्रकारे दिव्यज्ञान प्राप्त झाले. तदनंतर हातात खराटा, अंगात फाटका सदरा, डोक्यावर खापर, हातात काठी अशा वेषात ते गावोगावी फिरू लागले. गावोगावी जाऊन ते गावातील कचरा झाडून काढत आणि स्वतःच्या खापरात जे कोणी वाढेल ते अन्न तेथेच बसून खात असत. गावोगावी भटकत असतांना तेथिल लोकांना ते स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगत असत. अज्ञान, अंधश्रद्धा यावर कडाडून टीका करीत असत. आपल्या मुलांना शाळेत शिकवायला पाठवा असा त्यांचा आग्रह होता. ते अडाणी असले तरी पुढची पिढी चांगली घडावी त्यांना योग्य दिशा मिळून त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी ते रात्रीला कीर्तनातून शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगत.
बालपणापासूनच गाडगेबाबांनी समाजाचे बारीक अवलोकन केले होते. त्यांनी गरीबी, दारिद्रय अगदी जवळून बघितले होते. अंधश्रद्धा व अडाणीपणामुळे समाजाची सुधारणा होऊ शकत नाही हे त्यांच्या निदर्शनास आलं. शिक्षणा अभावी समाज मागासलेला आहे. समाजाची सुधारणा अज्ञान दूर केल्याशिवाय होवू शकत नाही हा अभ्यास त्यांनी केला. स्वतः कष्ट केल्याशिवाय भाकर मिळू शकत नाही. तेव्हा स्वावलंबी जीवन जगण्याचा त्यांनी स्वतः कृतीतून संदेश दिला. देव दगडात नसून तो माणसांतच आहे असं सांगणारे गाडगेबाबा यांच्या किर्तनाचा कल हा आध्यात्मिक बाजूने नव्हता तर भौतिक बाजूने होता. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला..सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला..” हे भजन केवळ ते लोक जागृतीसाठी वापरत. त्यांचा विश्वास देवावर नव्हता तर स्वकर्तृत्वावर होता. अज्ञानी व मागास समाजाची प्रगती केवळ शिक्षणानेच होवू शकते हे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागातील गावांना भेट दिली… प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेचे, स्वावलंबनाचे धडे देत ते पुढच्या प्रवासाला निघत असत.
गाडगेबाबा खरोखरच वैराग्यमुर्ती होते. त्यांनी संसाराचा त्याग करून समाजाच्या कल्याणासाठी आपले सर्व जीवन वाहीले. सामाजिक सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे ते थोर युगप्रवर्तकच ठरले.
संत परंपरेनुसार गाडगेबाबांनी किर्तनातून अंधश्रद्धा आणि विषमता याला फाटा दिला आहे. फक्त स्त्री व पुरुष या दोन जातींव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही जाती नाहीत.. सर्व सारखेच आहेत. कोणताही भेदभाव करू नका असं ते किर्तनातून सांगत असत. संत गाडगेबाबा बोलघेवडे संत नव्हते तर ते कृतिशील संत होते. ते आधी करून दाखवित नंतर सांगत असतं. गावातील घाण साफ करता करता ते लोकांच्या मनातील घाणही साफ करीत असत. अंगावर चिंध्या पांघरणारा हा ज्ञानी अवलिया मनाने खूप खूप श्रीमंत होता.. त्यांनी समाजाला दाखवून दिले की, माणूस केवळ धनाने श्रीमंत होत नसतो तर त्याच्या अंगी असलेल्या उच्च कोटीच्या सात्विक, शुध्द, प्रामाणिक, सद्गुणी विचारांनी आणि परोपकारी वृत्तीने माणूस श्रीमंत होतो. समाज प्रबोधनाचे कार्य करतांना अनेक श्रीमंत लोकांनी गाडगेबाबांना देणग्या दिल्या.. परंतु या देणग्यांच्या रकमेतून त्यांनी अनेक जागी धर्मशाळा बांधल्या,गोशाळा व जनकल्याणाची कामे केली. त्या रकमेचा वापर स्वतः साठी कधीच केला नाही..
आजकालच्या किर्तनकारांसारखे गाडगेबाबा कधीच पैसे घेत नसतं. ज्या गावी किर्तन असायचे त्या गावी ते जेवत सुद्धा नव्हते. कुणी दिलेले सुग्रास भोजन ते गरीबांना देत असतं आणि स्वतः मात्र चटणी भाकर आनंदाने खात. अशा महान विभूतींला समाजसुधारक म्हणायचे की, किर्तनकार ? समाजप्रवर्तक म्हणायचे की, प्रबोधनकार ?
किर्तनातून जनकल्याणाचा , जनजागृतीचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या मनावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मोठी छाप होती. बाबासाहेबांना ते खूप मानीत. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्राणज्योत मालवली. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. बाबासाहेब आंबेडकरांसारखा अमुल्य हिरा देशाने गमावला होता. याच गोष्टी चे संत गाडगेबाबा यांना अतीव दुःख झाले. वेदनेने त्यांच्या मनाला क्षती झाली आणि २० डिसेंबर १९५६ लाच संत गाडगेबाबा यांनी सुद्धा शेवटचा श्वास सोडला. १४ नोव्हेंबर ला पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे शेवटचे किर्तन ठरले.
जो समाजाच्या जागृतीसाठी आणि कल्याणासाठी आपल्या संसाराचा त्याग करतो अशा महापुरुषाला काय म्हणावे? परोपकार करणे हाच ज्याचा ध्यास आहे अशा महापुरुषाला काय म्हणावे? निष्काम कर्मयोगी म्हणावे की वैराग्यमुर्ती? दिशादर्शक म्हणावे की एक प्रकाशमय ज्योत ?
अशा थोर समाजप्रवर्तक संताला, गाडगे महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम. आज स्मृतीदिनी त्यांना आपण सारे युग परीवर्तनाची श्रद्धासुमने वाहूया..
त्यांचे विचार आत्मसात करून त्या विचारांचा आपल्या जीवनात समावेश करून त्यांनी दाखविलेल्या वाटेवर चालण्याची शपथ घेणे हीच आजच्या दिवशी त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.

📚✍️
सौ.सुनिता आनंद तागवान
कवयित्री, लेखिका,समिक्षिका
आरमोरी जिल्हा गडचिरोली
📲८१४९९३५३३२