श्रीमती मयुरी मेश्राम यांनी केला देहदानाचा संकल्प

425

तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वांचे अनुसरण

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
ब्रम्हपुरी (जिल्हा चंद्रपूर):तथागत गौतम बुद्धाने दहा पारमिता सांगितल्या आहेत. त्यात दान हे एक तत्व सांगितले आहे. त्याला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.

त्याकरिता कुणी रक्तदान कुणी नेत्रदान तर कुणी आपले काही अवयव दान करून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत असतात. ह्यातून प्रेरणा घेऊन सौ. मयुरी ज्ञानेश्वर मेश्राम मु. फुलेनगर, आरमोरी रोड (पेठवार्ड) ब्रम्हपुरी यांनी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दीनाचे औचित्य साधून मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला.

सौ. मयुरी मेश्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यात अती दुर्गम भागात राहून आरोग्य सेवा प्रदान केली.त्यातून आरोग्य सेवा व जनसेवा काय असते,याची त्यांना प्रचिती आली. मृत्यू पावल्यानंतर आपले शरीर जळण्यापेक्षा किंव्हा मातीत पुरण्यापेक्षा ते जर वैद्यकीय महाविद्यालयाला दान केले तर आपले अवयव इतर गरजू रुग्णाच्या कामात येतील. शिकणाऱ्या डॉक्टर विद्यार्थांना अभ्यासाच्या कामात येतील, हा विचार करून त्यांनी आपल्याही हातून एक सामाजिक कार्य घडावे या करिता 24 ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन फॉर्म भरून नाव नोंदविले.त्यानंतर देहदानाचा फॉर्म दिनांक 25/10/2023 रोजी भरला.

यावेळी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. खंडाळे, डॉ. जीवने, प्रा. डी के मेश्राम, डॉ. नागमोती, श्रीमती अंजिरा आंबीलडूके ,एन. सी. डी समुपदेशक उपस्थित होते.

सौ. मयुरी मेश्राम ह्या दलीत मित्र, जेष्ठ पत्रकार तथा प्रा. डी. के. मेश्राम यांच्या पत्नी असून त्यांनी सुद्धा देहदानाचा संकल्प केला आहे हे विशेष!