बैठकीला पदाधिकारी राहणार उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली/भंडारा:विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या पूर्व विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक दि. १ नोव्हेंबर २०२३, बुधवारला, दुपारी १ वाजता, दिनेश काळे निवास, राजीव गांधी चौक,नहर रोड,निर्वाण हाॅस्पीटल जवळ भंडारा येथे आयोजित करण्यात आली आहे.
मिशन २०२३ अंतर्गत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची परिपूर्ती करण्याकरिता आंदोलनाची पुढील दिशा व तीव्रता ठरवणे. तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली विभागीय मेळाव्याच्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
यावेळी विराआस अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड.वामनराव चटप, देशोन्नती चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले, महिला आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्षा रंजनाताई मामर्डे,पूर्व विदर्भ अध्यक्ष अरूण केदार, युवा आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीला भंडारा – गोंदिया- गडचिरोली- चंद्रपूर- वर्धा- नागपूर जिल्ह्यातील कोअर कमेटी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा समन्वयक, शहर अध्यक्ष, शहर समन्वयक, महिला आघाडी, युवा आघाडी, सोशल मीडिया अध्यक्ष व इतर आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी पूर्व विदर्भ बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष दिनेश काळे, समन्वयक विनोद बाभरे व आयोजकांनी केले आहे.