10 ऑक्टोंबर सकल ओबीसी महामोर्चा: ओबीसींनो,लाखोच्या संख्येने सहभागी व्हा!

58

आरमोरी ओबीसी संघटना पदाधिकारी यांनी केले आवाहन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी/गडचिरोली,दि.९ आॅक्टोबर :मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या काळ्या जीआर मुळे संपूर्ण ओबीसी समाजाची मोठी सामाजिक, आर्थिक व राजकीय हानी होणार आहे. आपल्या ओबीसी समाजाच्या अस्तित्वाचा, न्याय, हक्क आणि अधिकाराचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. हजारो वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ओबीसींच्या आरक्षण, शिक्षण, सरकारी नोकऱ्या, राजकीय प्रतिनिधित्व ह्या एका जीआर मुळे संपुष्टात येणार आहे. हा जीआर म्हणजे ओबीसींच्या मूलभूत हक्कावर, अधिकारावर जाणीवपूर्वक सरकारने खेळलेला कुटील डाव आहे.हा डाव उलटवून लावण्यासाठी आणि आपले आरक्षण, नोकऱ्या, आणि राजकीय प्रतिनिधित्व वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरून एकजुटीने मोठी लढाई लढावी लागत आहे. आपल्या मूळ आरक्षणावर गदा आणून संविधान विरोधी कृती करणाऱ्या ह्या सरकारचं षडयंत्र समजून घ्या, त्यामुळे हा जीआर रद्द करण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईत लाखो ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन आरमोरी येथील ओबीसी संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,, नव्या जीआर मुळे लाखो मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश केला जाणार आहे.आधीच लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण कमी असताना त्यात मराठा समाजाच्या समावेशामुळे मूळ ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे.मूळ ओबीसींना मिळणाऱ्या नोकऱ्या भविष्यात खोट्या ओबीसींना मिळणार आहेत. शैक्षणिक,नोकरी, राजकीय प्रतिनिधीत्वातसुद्धा खोटे ओबीसी वाटेकरी होणार आहेत.यापुढे मूळ ओबीसी चे मुले मुली आयएएस,आयपीएस, पीएसआय, डॉक्टर, इंजिनियर, वकील या पदावर पोहोचू शकणार नाही. त्यामुळे मराठ्यांचे ओबीसी करण करणारा दिनांक 2 सप्टेंबर चा अन्यायकारक आणि संविधान विरोधी जीआर सरकारने तात्काळ रद्द करावा. मराठा समाजाला खोटे कुणबी दाखले देण्याचे षडयंत्र त्वरित थांबवून आतापर्यंत दिलेल्या बोगस दाखल यांची चौकशी करून श्वेत पत्रिका काढावी, ओबीसींची खरी लोकसंख्या निश्चित करण्यासाठी आणि” जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी “या तत्त्वानुसार हक्क देण्यासाठी देशव्यापी जातीनिहाय जनगणना तात्काळ सुरू करावी, ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्व द्यावे तसेच ओबीसी समाजाच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध आणि आपल्या संविधानिक हक्काच्या संरक्षणासाठी ही लढाई आहे तरी आपल्या न्याय व हक्कासाठी दिनांक १० आॅक्टोंबर २०२५ रोजी यशवंत स्टेडियम नागपूर येथून निघणाऱ्या सकल ओबीसी महामोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील लाखो ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी संघटना आरमोरीचे विजय सुपारे, मनोज पांचलवार,इंजि. चेतन भोयर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.