वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. महाजन सरांची भेट
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
पुणे :: आळंदी येथे होणाऱ्या आठव्या पर्यावरण संमेलनाच्या तयारीसाठी पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव धीरज वाटेकर, मंडळाचे प्रतिनिधी संजय गायकवाड, विनीत भोसले यांनी आठव्या पर्यावरण संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्रीधर महाजन सर यांची बुधवार, 18 डिसेंबर रोजी भेट घेतली. या भेटीत पर्यावरणीय समस्यांवर उपाय, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणीय आव्हानांवर चर्चा करण्यात आली.
प्रा. महाजन सरांनी पर्यावरणीय क्षेत्रातील नव्या संशोधनांवर प्रकाश टाकत प्रतिनिधींना भविष्यकालीन दिशा दाखवली. त्यांनी विद्यार्थ्यांपासून ते समाजातील सर्व स्तरांपर्यंत पर्यावरण विषयक जनजागृती पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मंडळाच्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन केले.
याच अनुषंगाने, संमेलनाचे प्रमुख पाहुणे आयएएस अधिकारी श्री. अशोक काकडे यांनाही निमंत्रण देण्यात आले. त्यांनी संमेलनाला उपस्थित राहून मार्गदर्शन देण्याचे आश्वासन दिले आहे.
पुणे पुस्तक महोत्सवाला भेट
संमेलनाच्या निमित्ताने प्रतिनिधींनी पुणे येथील पुस्तक महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवातील पर्यावरणीय ग्रंथ पाहून संमेलनाच्या निमित्ताने पर्यावरण प्रेमी आणि प्रतिनिधींना यातील ग्रंथभेट देण्यात येणार आहे. पर्यावरणीय ग्रंथांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्याचा मंडळाचा उद्देश आहे.
पर्यावरण संमेलनाचे यशस्वी आयोजनाची तयारी
संमेलनाच्या आयोजनासाठी मंडळाने तयारी सुरु केली आहे. आठव्या पर्यावरण संमेलनासाठी सर्व तयारी पूर्ण होत असून, हे संमेलन पर्यावरणीय जाणीव जागृती क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
अशी माहिती संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.









