धरती आबा…’नाटकाच्या सन्मानात पुन्हा एका पुरस्काराची भर

115

मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणेने पुरस्कार केला जाहीर

झाडीपट्टी आनंदली!

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 
गडचिरोली:जगप्रसिद्ध असलेल्या व गेल्या सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांना त्यांच्या विविध उत्कृष्ट वांड्.मय निर्मीतीसाठी श्रीस्थानक राज्यस्तरीय पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना नामवंत मराठी साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.

महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्यवाड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या “धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या नाटकास नाट्यलेखनाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथील कार्यवाह तसेच पुरस्कार समिती सदस्य व साहित्यिक चांगदेव काळे यांनी पत्राद्वारे कळविले असून दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, सरस्वती मंदिर, वा.अ.रेगे सभागृह , पहिला मजला, जिल्हा परिषद कार्यालयासमोर, स्टेशन रोड, ठाणे(पश्चिम), येथे होणाऱ्या संस्थेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात हा पुरस्कार सरस्वती पुरस्काराने सन्मानित शरणकुमार लिंबाळे, सुप्रसिद्ध साहित्यिक यांचे हस्ते अनेक मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, व सन्मानपत्र असे आहे. विशेष म्हणजे या नाटकास यापूर्वी साहित्य सेवा प्रज्ञामंच , पुणे यांचा ‘उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार -२०२३’ प्राप्त झाले आहे.

यापुर्वी त्यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकास नाट्यलेखनाचे पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील *’गगनगिरी महाराज साहित्य गौरव पुरस्कार – २०२३* ‘, मौजा फलटण (जिल्हा- सातारा येथील *धर्मविर संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य पुरस्कार- २०२४ व तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांचे तितिक्षा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार- २०२४ झाडीबोली साहित्य मंडळ, शाखा- गडचिरोली यांचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार-२०२४* इ. पुरस्कार प्राप्त झाले आहे . या नाटकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या जनयोद्धा राष्ट्रीय समारोहात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.

चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, महापूजा, बहूढंगी समाधीवाले बाबा, स्पेशल रिपोर्ट, धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ,व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.