हत्तीरोग दुरीकरण औषधोपचार मोहिमेचा केला शुभारंभ

62

प्रत्यक्षदर्शी औषध सेवन पध्दतीचा होणार अवलंब

हत्तीरोगमुक्त गडचिरोलीकडे निर्णायक पाऊल

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि. ९ : हत्तीरोगमुक्त गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्वसमावेशक हत्तीरोग औषधांबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलींद नरोटे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः गोळ्या खाऊन औषधोपचार मोहिमेची सुरुवात केली.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ही मोहिम गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांत राबविण्यात येणार आहे.

जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत आज आमदार मा. डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात गोळ्या वितरीत करून मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

एमडीए-आयडीए म्हणजे हत्तीरोग दुरीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या तीन औषधांचा समन्वित उपचार असून, या मोहिमेत दोन वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना औषधे देण्यात येणार आहेत. प्रत्यक्षदर्शी औषध सेवन (Directly Observed Treatment) पद्धतीने ही मोहिम राबविण्यात येत असून, औषधांचा संपूर्ण डोस घेणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. वर्षा लहाने, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजिता वाडिवे, जिल्हा किटकजन्य रोग सल्लागार राजेश कार्लेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000