उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे डायलिसिस सेवांचे उद्घाटन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली),दि.१२: गडचिरोली जिल्ह्यातील किडनी आजारग्रस्त रुग्णांना सुलभ व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे Indian Public Health Standards (IPHS) अंतर्गत डायलिसिस सेवांचा शुभारंभ करण्यात आला. सदर डायलिसिस सेवांचे उद्घाटन सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या हस्ते झाले.
ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना डायलिसिससाठी जिल्हा मुख्यालय किंवा खाजगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. आरमोरी येथे डायलिसिस सेवा सुरू झाल्यामुळे रुग्णांचा वेळ, खर्च व त्रास कमी होणार असून त्यांना त्यांच्या परिसरातच आवश्यक उपचार मिळणार आहेत.
यावेळी जिल्हा आरोग्य यंत्रणेतील अधिकारी डॉ. बागराज धुर्वे निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. राजकुमार कोरेटी, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. छाया उईके, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय आरमोरी, वैद्यकीय अधिकारी, परिसेविका/परिचारिका तसेच इतर रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अद्ययावत व जीवनरक्षक सेवा उपलब्ध करून देणे हे आरोग्य विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. डायलिसिस सेवेमुळे किडनी आजाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.
उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे सुरू झालेली ही डायलिसिस सेवा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी कळविले आहे.
0000









