जागतिक हिवताप दिन:गडचिरोलीत प्रभातफेरीतून केली जनजागृती

152

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि. २५:हिवतापाला संपवू या पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा” या संकल्पनेखाली आज दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून गडचिरोलीत विविध विभागांचे सहभागातून विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करुन जनजागृती केली.यात हिवताप निर्मूलनासाठी जनतेला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली.

सर्वप्रथमत: मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रभातफेरीचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रभातफेरीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षणार्थी, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांनी हिवतापावरील घोषवाक्याच्या निनादात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शिंदे, डॉ. किलनाके, डॉ. अमित साळवे, डॉ. प्रफुल हुलके, डॉ. प्रफुल गोरे, डॉ. प्रशांत पेंदाम, डॉ. रुपेश पेंदाम, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. बागराज धुर्वे, डॉ. पुजा धुळे, शंतनु पाटील आदी मंचावर उपस्थित होते.

यावेळी डॉ. प्रताप शिंदे यांनी हिवताप रोखण्यासाठी नविन उपाययोजना सांगत मार्गदर्शन केले. डॉ. माधुरी किलनाके यांनी हिवतापविषयी माहिती देताना रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी संदर्भात मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक श्री. राजेश कार्लेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी ढोडरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. संजय समर्थ यांनी केले.

या कार्यक्रमासाठी हिवताप व हत्तीरोग विभागातील तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आदींच्या कर्मचारी वर्गाने विशेष सहकार्य केले.

प्रभातफेरीचा समारोप महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आला.


जिल्हा आरोग्य अधिकारी व हिवताप विभागाने नागरिकांना हिवताप व डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी पुढील सूचनांचे काटेकोर पालन करावे व आपले आरोग्य जपावे असे आवाहन केले आहे.
__________________________________________________

# हे करावे उपाय 

आठवड्यातून एकदा पाणी साठवलेली भांडी स्वच्छ करा, बंद भांड्यांत टेमीफॉस टाका, पाण्याच्या टाक्यांना झाकण लावा, घरात व परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, फुलदाण्या, कुलर, फ्रिज यातील पाणी नियमित काढा, पूर्ण बाह्याचे कपडे घाला, रात्री मच्छरदाणीचा वापर करा, ताप आल्यास त्वरित रक्ततपासणी करून उपचार घ्या.
————————————–
0000