डीईआयसीचे मोलाचे योगदान
जागतीक महिला दिनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.२०: गडचिरोली जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालयातील एसएनसीयू कक्षात अवघ्या 900 ग्रॅम वजनाची नवजात बालिका दाखल झाली होती. तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि तिला विशेष निगा राखण्याची आवश्यकता होती. तिच्या जन्मानंतर बालरोगतज्ज्ञांनी नियमित तपासणी सुरू ठेऊन तिच्या आरोग्यात स्थिरता आणली. तिला उच्च स्तरीय विशेषज्ञ सेवेची गरज असल्याने डीईआयसी (द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष) येथे नोंदणी करण्यात आली व ७ मार्च रोजी, बाह्यस्त्रोताने असलेले डॉ. अंकिता अप्पलवार बाल नेत्ररोग तज्ज्ञ यांनी तिच्या डोळ्यांची तपासणी केली.तपासणीदरम्यान, या बालिकेला रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी (ROP) हा गंभीर डोळ्यांचा आजार असल्याचे निदान झाले. हा आजार प्रिमॅच्युअर बाळांमध्ये आढळतो आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास तो कायमच्या अंधत्वाचे कारण ठरू शकतो. या आजाराची लक्षणे दिसल्यानंतर त्वरित उपचार करणे गरजेचे होते. डीईआयसी मार्फतीने उच्चस्तरीय बाल नेत्र विशेषज्ञ सल्ला घेण्यात आला. या बालिकेच्या भविष्यासाठी कोणताही विलंब घातक ठरू शकला असता, म्हणूनच, डॉक्टरांनी तातडीने लेझर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हा निर्णय जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आला आणि ८ मार्च रोजीच शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.
महिला दिनीच लेझर शस्त्रक्रियेची जबाबदारी साराक्षी नेत्रालय, नागपूर येथील विशेषज्ञ डॉ. शिल्पी नारनवरे (Vitreo retina surgeon) यांनी पार पाडली. तातडीने सर्व समावेशक तपासणीकरून या नाजूक बालिकेच्या डोळ्यांची लेझर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर बालिकेच्या डोळ्यांनी प्रकाश पाहिला आणि तिच्या भविष्यातील अंधत्वाचा धोका टळला.
या संपूर्ण उपचार प्रक्रियेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश कुमार सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पेंदाम, यांचे मार्गदर्शन लाभले. सोबतच डीईआयसी ऑप्टोमेट्रिस्ट नम्रता मुंजमकर आणि एसएनसीयू प्रमुख परिचारिका कल्पना सोनटक्के यांच्या समन्वयाने या नवजात बालिकेला नवी दृष्टी मिळाली. यामध्ये नवजात बालिकेला शस्त्रक्रियेकरिता पाठपुरावा करिता नागपूरला ने-आन करणारे रुग्णवाहिका चालक हरिभाऊ शेगोकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवा पुरवताना अनेक अडचणी येतात. अशा अनेक प्रकारच्या समस्या असतात, आणि सर्वांनी जबाबदारीने काम करणे अत्यंत गरजेचे असते. आरोग्य सेवेत समन्वय, वेळेवर उपचार आणि प्रभावी निर्णय क्षमता असणे ही अत्यावश्यक बाब आहे. या संपूर्ण प्रक्रियेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली त्वरित कृती आणि सेवा भावनेतून केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेच्या निमित्ताने महिला डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील महिलांनी एका नवजात बालिकेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महान कार्य केले. जागतिक महिला दिनाच्या दिवशी ही घटना घडल्याने, महिला सक्षमीकरणाचा हा एक अनोखा आणि प्रेरणादायी संदेश ठरला.हे विशेष!
0000