जनजागृतीपर संकल्प : ‌.’..आता धरु एकच ध्यास,ना मरेल माणूस ना साप !’

114

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली),दि.२९ जुलै: आज नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नाग सापाचे पूजन करून नागपंचमीचा सण मोठ्या आस्थेने संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. पुर्वीपासूनच सापाचे महत्व आमच्या पूर्वजांना कळले असावे. त्यामुळे नागपंचमी निमित्ताने सापाचे संवर्धन केले जात असावे. परंतु सापांविषयी लोकांमध्ये फार भिती व गैरसमज असल्याने साप घरात,अंगणात दिसला तरी त्याला काठीने मारले जाते. ही भीती दूर करून सापाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.

निसर्गातील प्रत्येक सजीवांचे महत्त्व कमी अधिक प्रमाणात आहेत. साप देखील पर्यावरणातील अन्नसाखळीतील महत्वाचा घटक मानला जातो. साप जैवविविधतेतील अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. आपल्या भारतात सुमारे २७८ सापाच्या प्रजाती आढळून येतात त्यातील सुमारे १५ टक्के साप हे विषारी असून उर्वरित साप हे बिनविषारी गटात मोडतात. विषारी सापात प्रामुख्याने नाग,मण्यार, घोणस, फुरसे, पटेरी मण्यार,चोपडा, पोवळा यासारख्या सापांचा समावेश होतो. साप हे शेतातील उपद्रवी असणारे उंदीर,बेडूक, किडी, मच्छर यांना भक्ष्य बनवितात त्यामुळे अन्नसाखळी नियंत्रित ठेवण्याचे काम साप करीत असतात. तसेच विषारी सापाच्या विषापासून गंभीर स्वरूपाच्या आजारावरील औषधे बनविण्यासाठी वापर केला जात असल्यामुळे सापांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. सापांविषयी जनजागृती मोहीम राबवून सापविषयीची भिती, गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.

 

यासाठी शासनस्तरावर,वनविभाग,N.G.O.(स्वयंसेवी संस्था)प्रयत्न करीत आहेत; परंतु त्या तोकड्या पडत असल्याने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. भारतात भिती, गैरसमज व अज्ञानापोटी दर वर्षाला ५०,००० लोक मृत्यू पावतात ही गंभीर बाब आहे. साप म्हणजे विषारी अशी लोकांची मानसिकता आहे. केवळ भीतीपोटी सापाला विनाकारण मारले जाते. त्यामुळे सापाच्या प्रजाती मध्ये कमालीची घट झाली आहे. साप कोणत्याही माणसाला सहजासहजी चावत नसून त्याच्या अधिवासात अतिक्रमण अथवा चुकीने इजा झाल्यास सर्प दंशाच्या घटना घडतात. यासाठी माणसाच्या मनातील भीती बाजूला सारुन ‘आता धरू एकच, ध्यास ना मरेल माणूस ना मरेल साप!’ या घोषवाक्याचा आधार घेऊन सापाविषयी प्रेम, आदराने त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प या नागपंचमीच्या निमित्याने करणे आवश्यक आहे.

✍️ देवानंद दुमाने.
अध्यक्ष
वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी जिल्हा – गडचिरोली.

(संकलन: विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क टीम )

(फोटो साभार: रणजित बनकर)