अंध कलाकारांचे ‘सूरसंगीत’ निनादले!

209

आरमोरीत रंगले सुरमयी रक्षाबंधन उत्सव

अतिथी व रसिकांनी दिली दाद

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): ‘कलेशिवाय कलेवर नाही’, असं म्हटलं जातं.ते अगदी तंतोतंत खरे ठरविले आहे, आरमोरीसारख्या विराट नगरीत डोळ्यांनी अधू असलेल्या(अंध) दिव्यांग कलाकार मंडळींनी..निमित्त होते रक्षाबंधन उत्सवाचे!अंध कलाकारांनी पंचरंगी ब्लाईंड म्युझिकल आॅर्केष्ट्रा चे रूपांतर २२ आॅगस्टच्या रात्री स्वरांच्या साजाने जादुई सुरांत(मॅजिकल आॅर्केष्ट्रा)केव्हा केले हे रसिकांनाही कळायला उसंत मिळाली नाही.असा हा दुग्ध शर्करा योग सदृश्य दिव्यांगांचा आॅर्केष्ट्रा ‘वन्स मोअर ‘ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करीत वर्षभर पुरतील अशा सुरांची साठवण करीत दर्दी प्रेक्षकांनी निरोप घेतला.

बेरोजगार अंध समिती देसाईगंजचे वतीने आरमोरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात पंचरंगी ब्लाईंड म्युझिकल आॅर्केष्ट्रा चे आयोजन करण्यात आले होते.

सुरमयी कार्यक्रमाचे उद्घाटन काॅंग्रेसचे युवा नेते निशांत वनमाळी यांनी केले.तर गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती,स्वरसम्राज्ञी वेणूताई ढवगाये यांनी सुमधुर गीत गायन करून स्वरसुमन अर्पित केले होते.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे, महाराष्ट्र राज्य कलावंत संघटनेचे जिल्हा सचिव उमेष हर्षे, सामाजिक कार्यकर्त्या मेघा मने,विभा बोभाटे, श्री उंदीरवाडे,आरमोरी न.प.चे माजी सभापती भारत बावनथडे, निंबेकार,पत्रकार हरेंद्र मडावी, विधायक दीपस्तंभ न्यूज चे उपसंपादक लिलाधर मेश्राम,बेरोजगार अंध समिती देसाईगंजचे अध्यक्ष अजय दादगाये, उपाध्यक्ष सुभाष गेडाम, सचिव घनश्याम केवट, मुश्ताक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समितीच्या पदाधिकारी रोहिणी पालपत्तुरवार, शुभांगी गेडाम,संध्या दादगाये,उत्तरा देवारे, ज्योत्स्ना राऊत व इतर दिव्यांग भगिनींनी स्वरमंचकावरील उपस्थित प्रमुख अतिथींचे औक्षण करून राख्या बांधल्या.

त्यानंतर गणेश वंदन, सरस्वती वंदन,कानडा राजा पंढरीचा अशा एकाहून एक भक्तीगीत, भजन,सुगम संगीत इत्यादी सरस व सुरस गीतांचे गायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.रसिक श्रोत्यांची वाहवा मिळविली.

कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन संगीत विशारद सुभाष गेडाम यांनी केले.

यशस्वीतेसाठी कार्तिक केवट,रूपचंद वैरागडे,केवळराम नागोसे व सर्व दिव्यांग कलाकार व आरमोरीकर मंडळींनी सहकार्य केले.