नाट्य लेखक चुडाराम बल्हारपुरे यांचाही होणार सन्मान
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली:ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे गेल्या ७ वर्षांपासून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा’ आयोजित करण्यात येतात. व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना साहित्य प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्यवाड्:मय प्रकारात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकास नाट्यलेखनाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे “ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या पुरस्कार समिती प्रमुख प्रा . विजय काकडे व संयोजक प्रकाश सस्ते यांनी कळविले आहे. येत्या मंगळवारी दि. २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मौजा फलटण येथे होणाऱ्या ७ व्या धर्मवीर संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. विशेष म्हणजे या नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या जनयोद्धा राष्ट्रीय समारोहात १३ फेब्रुवारीला या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.
चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, बहूढंगी समाधीवाले बाबा, स्पेशल रिपोर्ट, धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ,व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, पत्रकार संजय तिपाले, रोहिदास राऊत,नरेश बावणे, मिलिंद उमरे, प्रल्हाद म्हशाखेत्री व प्रमोद गेडेकर तसेच प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक) , प्रा. प्रब्रम्हानंद मडावी, पत्रकार पुंडलिक भांडेकर व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.








