महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांना निरोप व परिक्षा मार्गदर्शन
इयत्ता ९ वी च्या विद्यार्थांचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली),दि.९ फेब्रुवारी:स्थानिक महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना दिनांक ९ फेब्रुवारीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांनी ‘परिक्षेला सामोरे जाताना ‘ या महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्यालय शिक्षक -पालक संघाचे उपाध्यक्ष विलास गोंदोळे, सहसचिव गणेश कांबळे, महिला पदाधिकारी सौ.अनिता लठ्ठे,सौ.निशा पेटकुले, सहायक शिक्षक हेमंत निखारे, किशोर सहारे,हिवराज सयाम,प्रेम सयाम,सुनिल चट्टे,गौरव नारनवरे,चंद्रशेखर सुरपाम, सहायक शिक्षिका मावानी,प्रिती धाईत, सुषमा डांगे, डोंगरवार,मीना मसराम आदी मान्यवर उपस्थित होते.
निरोप घेताना आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देत विद्यालयातील तन्मय कुकडकर,सौरभ ढोडरे,सोहम खापरे आणि अल्ताफ शेख या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील विविध अनुभव सांगून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी प्राचार्य साईनाथ अद्दलवार यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटीच्या बळावर अथक परिश्रम घेत परिक्षेत भरघोस यश प्राप्त करून आपल्या विद्यालयाचे,गाव, तालुका व जिल्ह्याचे नावलौकिक करावे असे प्रतिपादन केले.
‘परिक्षेला सामोरे जाताना ‘ यावर मार्गदर्शन करताना विलास गोंदोळे यांनी आपल्या मेंदूची क्षमता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथा सांगत त्यांच्यातील आत्मविश्वास व व्यवस्थापन सिध्दांत यावर भर देत परिक्षार्थींनी स्वकेंद्रित होत परिक्षेत यशस्वी व्हावे असे आवाहन केले.तर विद्यालयाचे शिक्षक हेमंत निखारे, किशोर सहारे यांनी स्वानुभव सांगत परीक्षेची तयारी व परिक्षा कालावधीत थंड डोक्याने विचार करावा असे सांगितले.तसेच हिवराज सयाम यांनी कवितेच्या माध्यमातून तर मावानी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी उर्जा दिली.त्याचबरोबर सौ.निशा पेटकुले यांनी स्वतःच्या आयुष्यातील घडामोडी कथन करीत सबुरीचा सल्ला दिला.सौ.अनिता लठ्ठे यांनी येत्या २० फेब्रुवारीला होणा-या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात उपमुख्याध्यापक विरेंद्र गुंफावार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्व विशद करीत विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विद्यालयाला व वर्ग शिक्षकांना भेट वस्तू प्रदान केल्या.
कार्यक्रमाचे सुरेख संचालन कु.श्रावणी गरमळकर हिने केले. तर आभार विद्यार्थिनी कु. अक्षरा दिघोरे हिने मानले.
यशस्वीतेसाठी महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थांनी व शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांसाठी आयोजित अल्पोपहाराने करण्यात आली.









