विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यात लुटला खवय्येगिरीचा आनंद!

413

स्टालधारक विद्यार्थ्यांनी जाणून घेतले ‘खरी कमाई’चे गूढ रहस्य

शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय जिवनात स्वकष्टाची कमाई बाबत शिकवण देणारा ‘आनंद मेळावा’ या उपक्रमाचे आयोजन दिनांक. 24/12/204 रोज मंगळवारला करण्यात आले होते.यात बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तर इतर विद्यार्थ्यांनी स्टालधारक विद्यार्थ्यांकडून ग्राहक बनून खाद्यपदार्थ विकत घेऊन खवय्येगिरीचा मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन शिक्षणाधिकारी (माध्य) भुसे, उप शिक्षणाधिकारी अमरासिंग गेडाम, यांच्या हस्ते शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विलास गोंदोळे, प्राचार्य साईनाथ अद्दलवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक अद्दलवार व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध स्वादिष्ट व्यंजन तयार करून विक्रीसाठी मांडलेले होते.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माध्यमिक शिक्षणाधिकारी भुसे यांनी खरी कमाई बाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून या उपक्रमाचा उद्देश जाणून त्याची दैनंदिन जिवनाशी कशाप्रकारे सांगड घातली गेली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.तसेच विविध पदार्थ व त्यांच्या रेसिपी तसेच इतरही प्रश्नांना विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे देऊन मान्यवरांचे समाधान केले.

स्टालवरील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विविध पदार्थ खरेदी करून विद्यार्थ्यांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना खरी कमाई चे गूढ रहस्य उलगडले.

या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य अद्‌दलवार, उपप्राचार्य आंबोरकर, उपमुख्याध्यापक गुंफावार, जेष्ठ शिक्षक किशोर सहारे,गाईड प्रमुख प्रिती धाईत, मिना मसराम तसेच विद्यालयातील शिक्षक उपस्थित राहून सहकार्य केले.
_____________________