विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: नीती आयोगाच्या शिफारशीनुसार भारतातील वेगाने वाढणाऱ्या गिग/प्लॅटफॉर्म कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने, जिल्ह्यात ई-श्रम पोर्टलवर (e-shram portal) नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत, कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सहकार्याने जिल्हा आणि उप-जिल्हा स्तरावर नोंदणी वाढवण्याचे काम सुरू आहे. ५ सप्टेंबर २०२५ पर्यंत ही मोहीम चालणार आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना, विशेषतः ओला, उबर, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो आणि स्विगी यांसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे आहे. नोंदणी केलेल्या कामगारांना ओळखपत्र जारी केले जाईल आणि त्यांना आयुष्मान भारत सारख्या योजनांचा लाभ घेता येईल.
कामगार स्वतः www.eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मोफत नोंदणी करू शकतात. जर स्वतः नोंदणी करणे शक्य नसेल, तर जवळच्या सेतू केंद्र, तालुका स्तरावरील कामगार सुविधा केंद्र, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालय, किंवा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जाऊन नोंदणी करता येईल.
विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हयातील सर्व गिग/प्लॅटफॉर्म कामगारांना मोठ्या संख्येने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.
0000








