कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजने अंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.११: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील दारिद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना शासनामार्फत ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर ओलिताखालील जमीन १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून द्यावयाची आहे. सदर जमीन शासनाने लाभार्थ्यांना खरेदी करून द्यावयाची आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे. त्यांनी विकत असलेल्या जमीनीचा ७/१२, जमिनीचा नकाशा, धारण करीत असलेल्या जमीनीचा तपशील (नमुना ८-अ) जमीन मोजणी “क” प्रत, गाव नकाशा रु. १०० च्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र इत्यादी माहितीसह जमीन विक्रीबाबतचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा. शासना निर्णय दिनांकः १४ ऑगस्ट २०१८ नूसार जमीन खरेदीबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
सदर बाबी संदर्भात अधिकच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.
00000
गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप योजना
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.११: गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप करणे योजनेअंतर्गत गटई कामगारांना १०० टक्के अनुदान तत्त्वावर पत्र्याचे स्टॉल व रु. ५००/- इतके अनुदान देण्यात येते.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहे.
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा व गटई कामगार असावा. अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु. ४०,०००/- व शहरी भागात रु. ५०,०००/- पेक्षा अधिक नसावे. (यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.) अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड (कॅन्टोन्मेंट बोर्ड) किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाडयाने, कराराने खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वतःच्या मालकीची असावी. अधिक माहितीकरीता व अर्जाकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गडचिरोली कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.
00000







