आरमोरीत आंतरराष्ट्रीय योग दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

184

आमदार रामदास मसराम यांची प्रमुख उपस्थिती

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):येथील तालुका क्रीडा संकुल समिती आरमोरी तसेच हितकारिणी माध्य.व उच्च माध्य विद्यालय आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने “आंतरराष्ट्रीय योग दिन” दिनांक २१जून २०२५ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात व यशस्वीपणे साजरा करण्यात आला.योग दिनाला आरमोरीकर नागरीक, योग प्रेमी,साधक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या विशेष योग दिनाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

आमदार मसराम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगाचे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, ‘योग’ हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो मन:शांतीचा व जीवनशैली सुधारण्याचा प्रभावी मार्ग आहे. युवकांनी नियमित योग साधना अंगीकारली पाहिजे.असेही ते म्हणाले.

यावेळी आमदार मसराम यांनी आरमोरीतील क्रीडा संकुल अधिक आधुनिक, सुसज्ज आणि युवकांना पोषक असे बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.असे आश्वासन दिले.

कार्यक्रमानंतर आमदार मसराम यांनी संपूर्ण क्रीडा संकुल परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली व स्थानिक स्तरावर आवश्यक सुधारणा, सुविधा व विकास कामांची माहिती घेतली.

योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सत्रात अनेक योगप्रेमींनी सहभाग नोंदवला. विद्यार्थी, नागरिक, शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांनी योगासने, प्राणायाम व ध्यान साधना करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, आरमोरीचे पोलीस निरीक्षक गवते,नगर परिषद माजी सभापती भारत बावनथडे, पंकज खरवडे, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, पतंजली जिल्हा समन्वयक चाकिनारपुवार, पर्यवेक्षक श्याम बहेकार,योग शिक्षक धनराज कांबळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन तालुका क्रीडा संकुलचे मनोहर ज्ञानबोनवार , तर आभार प्रदर्शन मनोज मने यांनी केले.

———————————-