‘पृथ्वी’ तत्वाचा ‘आरोग्य’दायी योगा’योग’!

320

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
चंद्रपूर,दि.२१: जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती वासाळामक्ता यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगदिवस दिनांक २१ जून २०२५ रोजी विद्यार्थी तसेच वनहक्क व्यवस्थापन समीतीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

योग म्हणजे जुळणे.दोन वस्तू एकत्र करण्याला योग घडणे म्हणतात.भारतीय तत्वज्ञानानुसार आत्म्याच्या परमात्म्यासोबतच्या मिलनाला योग म्हटले आहे.असा योग घडण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी अष्टांग मार्गाचा अवलंब करण्याची शिफारस केली आहे तसेच पातंजल योग शास्त्रानुसार,यम ,नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि शेवटी समाधी असे एकूण आठ प्रकार सांगितले आहेत.समाधी अवस्था प्राप्त झाली तरच खऱ्या अर्थाने योग जुळून येतो.आपल्या व्यक्तीगत ( व्यष्टी) चैतन्याचा सामुहिक ( परमेष्टी) चैतन्यासोबत योग जुळून येतो.हा खरा योग आहे.काही लोकांना वाटते व्यायाम,आसन केले म्हणजे झाला योग दिवस साजरा.ज्या व्यक्तीचा सामुहिक चेतनेशी योग जुळून आला आहे तीच व्यक्ती इतरांना त्याबद्दल मार्गदर्शन करू शकते.बाकीचे फक्त आसने आहेत.
योगशास्त्र ही भारताची जगाला भेट आहे.भारतीय तत्वज्ञानानुसार जीवन जगाल तर जीवनाला अर्थ आहे नाहीतर निव्वळ विनोद आहे, हे मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देऊन ठणकावून सांगितले आहे.

दिवसेंदिवस शहरात सर्वत्र ‘योगा’ला सुगीचे दिवस आले आहेत.परंतु ग्रामीण भागात मात्र आजही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र वासाळामक्ता सारख्या गावात अगदी नैसर्गिक सानिध्यात व अत्यल्प साधनसामग्री उपलब्ध असलेल्या व्यवस्थेत तेथील विद्यार्थी वर्गाला व पंचक्रोशीतच नव्हे तर महाराष्ट्राच्या मनरेगा विभागाने दखल घेतलेल्या सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समीतीचे पदाधिकारी, आबालवृद्ध यांना योगदिनी संगीतमय वातावरणात योगाचे धडे दिल्याचा ‘योग’ मुख्याध्यापक विलास ना.करंबे गुरुजींनी घडवून आणला आहे.हेही नसे थोडके!

यावेळी सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्या आणि समितीचे क्रियाशील सचिव रामप्रकाश राऊत तसेच समितीचे तरूण उत्साही कार्यकर्ते प्रफुल्ल उईके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासाळामक्ता चे मुख्याध्यापक विलास करंबे आदी उपस्थित होते.