चंद्रपूर येथे 30 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे आंदोलन

210

नरभक्षक वाघ आणि हत्तीचा बंदोबस्त करण्यासह असेल प्रमुख मागण्याचा समावेश

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाच्या हल्यात वाढ झालेली आहे, त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा जिवही जात आहे. सोबतच अनेक गावांची आणि शेतीची नुकसान होत असल्याने जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानासमोर आज दिनांक ३० नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, हत्ती, वाघ किंवा अन्य कोणत्याही वन्यप्राण्याच्या हल्यातील जखमी व मृत व्यक्तीच्या कुटुंबास तातडीने भरीव आर्थिक मदत करण्यात यावी. जंगली प्राण्यांच्या हल्यात नुकसान झालेल्या शेती आणि घराचे पंचनामे करून कुठल्याही जाचक अटी न लादता सरसकट किमान 25 हजाराची आर्थिक मदत करण्यात यावी, वनपट्याचे प्रलंबित मागण्या निकाली काढून वनपट्टे व सातबाऱ्याचे वितरण करण्यात यावे, वनविभागाच्या निष्काळीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याने वनअधिकाऱ्याना गृहीत धरून मुख्य वनरक्षक आणि उपमुख्य वनरक्षकावर भादवी 302 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, हत्ती आणि वाघाचे लोकेशन ट्रेस करण्याकरीता वनविभागाला अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा ची व्यवस्था करून देण्यात यावी.आदी मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्हा काँग्रेसच्या वतीने नागपूर विधानभवनावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली आहे.

सदर आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने सामील व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.