रामाळा परिसरातील घटना
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): तालुक्यातील रामाळा येथील शेतशिवारात खरीप हंगामातील हलक्या धानांची धानकापणी करीत असताना, एका मजूर महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज दिनांक १९आक्टोंबर २०२३रोजी दुपारी १२.३०चे सुमारास घडली.
ताराबाई एकनाथ धोडरे मु.आरमोरी(काळागोटा) पो.ता.आलमोरी जिल्हा गडचिरोली असे व्याघ्र बळी ठरलेल्या मजूर महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सद्यस्थितीत खरीपातील हलक्या धानांच्या कापणीचा हंगाम सुरू झाला आहे.आरमोरी तालुक्यातील रामाळा येथील शेतशिवारात आरमोरीच्या काळागोटा परिसरातील सात-आठ महिला मजूर धान कापणी करीत होत्या.अशातच धान कापणी सुरू असतानाच अचानक वाघाने महिला मजुरावर जोरदार झडप घातली.झडप घातल्यानंतर काही अंतरावर वाघाने सदर महिलेला फरफटत नेले.त्यावेळी भेदरलेल्या अवस्थेतील सर्व महिलांनी जोरजोरात आरडाओरडा केला.त्यावेळी आजूबाजूच्या शेतशिवारातील लोकही धावून आले.त्यामूळे वाघ जंगलात निघून गेला.मात्र महिलेच्या नरडीचा घोट घेतल्यामुळे सदर महिला गतप्राण झाली.
सदर घटनेची माहिती वनविभागाला उपस्थितांनी दिली.तसेच सदर नरक्षक वाघाचा तत्काळ वनविभागाने बंदोबस्त करावा. भविष्यात पुन्हा बळी जाण्याची प्रतिक्षा करू नये अशी मागणी जनतेतून होत आहे.