आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते क्षयरुग्णांना फुड बॉस्केटचे वितरण

24

६९ निक्षय मित्रांकडून ३०२ रुग्णांना पोषण आहार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून क्षयरुग्णांना
औषधोपचारासोबतच प्रथिनयुक्त पोषण आहार मिळावा या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात व्यापक जनसहभागातून उल्लेखनीय कार्य होत आहे. या अभियानांतर्गत राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभागृहात प्रतीकात्मक स्वरूपात ५ क्षयरुग्णांना फुड बॉस्केटचे वितरण करण्यात आले.

—————————————
दि. ९ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन करण्यात आले होते. या अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे क्षयरुग्णांना उपचार काळात पोषणयुक्त आहाराची उपलब्धता करून देणे हा आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, समाजकार्यकर्ते, उद्योजक आदींनी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढाकार घेत क्षयरुग्णांना दत्तक घेऊन उपचार पूर्ण होईपर्यंत कोरडा पोषण आहार पुरवावा, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.
—————————————

गडचिरोली जिल्ह्यात या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६९ निक्षय मित्रांकडून एकूण ३०२ क्षयरुग्णांना फुड बॉस्केटचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये नियमितपणे पोषण आहार किट उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यामुळे रुग्णांच्या आरोग्य पुनर्प्राप्तीस मोठी मदत होत आहे.

यावेळी मंत्री आबिटकर यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी ‘निक्षय मित्र’ बनून या अभियानात सहभागी व्हावे तसेच अधिकाधिक क्षयरुग्णांना दत्तक घ्यावे व त्यांना पोषण आहार किट प्रदान करून टीवी मुक्त भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन केले.

0000