समस्याग्रस्त जनावरांचे कोंडवाडे सोर्ईसुविधायुक्त करा

82

 

आरमोरी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली मागणी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 

आरमोरी, ( जिल्हा गडचिरोली): आरमोरी नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या समस्याग्रस्त कोंडवाडे तसेच मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जनावरांचे योग्य व्यवस्थापन करुन संबंधित समस्या तातडीने नगर परिषदेने सोडवाव्यात अशी मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नगरपरिषद अंतर्गंत जनावरांचे कोंडवाडे हे अत्यंत चिखलमय दलदलयुक्त आहेत ,या जनावरांना पाहिजे त्या प्रमाणात चारापाणी खुराखाची उत्तम व्यवस्था नाही,जनावरांना पिण्याचे पाणी अस्वच्छ विषाणूयुक्त टाकी न साफ केलेले पाजले जाते,त्यात बांबूच्या काड्यासुध्दा टाकल्या जातात, असे नगरवासीयांच्या निर्देशनास येत आहे, यामुळे जनावरे अशक्त होत असुन त्यांची काळजी व वैद्यकीय उपचाराची सोय देखील नाही,

तसेच आरमोरी ते अरसोडा या मुख्य महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी फुलांची झाडे लावली आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात जनावरांचे मुख्य खाद्य गवत असल्याने ते खाण्यासाठी जातात व दिवस रात्र रस्त्याच्या मध्ये भागातच बसून असतात, त्यामुळे सुध्दा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, या बाबींचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा,असे निवेदन देऊन खालील प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत ,जनावरांच्या कोंडवाड्यातील चिखलमय दलदल स्वच्छ साफ व कोरडा ठेवण्यात यावा, बंदिस्त जनावरांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ चारा पाण्याची व्यवस्था करण्यात यावी,कोंडवाड्यात पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व निर्जंतुक व्यवस्था करावी,साथीचे आजारांची लागन होऊ नये म्हणून जनावरांची नियमित वैद्यकीय तपासणी करावी तसेच इतरही बाबींची पूर्तता संबंधित प्रशासनाने करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.

 

 शिष्टमंडळात प्रकाश खोब्रागडे, चुन्नीलाल मोटघरे ,संजय वाकडे,मोरेश्वर ठेंगळी, ऋषी रामटेके,मनोज दामले, मिनाक्षी सेलोकर, सिंधूताई कापकर,अमोल दामले आदी उपस्थित होते.

________________________________________