“घाबरू नका, पण सतर्क राहा”

279

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

गडचिरोली, वडसा, आरमोरी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.०८: जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसासोबतच गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील विसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना “घाबरू नका, पण सतर्क राहा” असे आवाहन करत नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेची उपाययोजना राबविण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत.

नदीकाठच्या गावांमधील संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पंडा यांनी देसाईगंज, आरमोरी व गडचिरोली तालुक्यातील परिस्थितीचा आढावा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला.

अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रसेनजीत प्रधाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी गडचिरोली, वडसा आणि आरमोरी तालुक्यातील नदीकाठचा अणि शहरातील खोलगट भागात पोलिस, जिल्हा परिषद व महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे तसेच शासकीय निवारा केंद्र येथे सर्व स्थलांतरीतांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्याचे सांगितले. त्यांनी पुरप्रवण क्षेत्रात प्रत्येक तहसील स्तरावर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवत संभाव्य पूरपरिस्थतीचा विचार करून बचाव व स्थलांतरणासाठी तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले असून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांनी घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

पूलावरून पाणी वाहत असल्यास तिथे मोटारसायकलने जाणे अत्यंत धोकादायक आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी जाऊ नये, तसेच नदी प्रवाह पाहण्यासाठी पर्यटन व सेल्फी घेण्याचे प्रकार पूर्णतः टाळण्याचेही आवाहनही त्यांनी केले आहे.

पोलीस विभागाने धोकादायक भागांमध्ये बॅरिकेटिंग करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

0000