जिल्हाधिकारी धानोरा तालुक्यात ऑनफिल्ड

205

आपत्ती व्यवस्थापन, मलेरिया नियंत्रण व आरोग्य विषयक उपाययोजनांचा घेतला आढावा

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.०७ : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिनांक ७ जुलैला धानोरा तालुक्यात भेट देत आपत्ती व्यवस्थापन, मलेरिया नियंत्रण, राष्ट्रीय महामार्ग व महसूल यंत्रणा आणि आरोग्य विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. पावसाळी काळात तालुक्यातील प्रशासनाच्या विविध यंत्रणांना अधिक सक्रिय व सजग राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तहसील कार्यालय धानोरा येथे आयोजित आढावा बैठकीत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव, तहसिलदार आम्रपाली लोखंडे तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

पूरप्रवण गावांसाठी नवसंजीवनी योजनेतून धान्य पोहोचले का याची चौकशी

मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचा विचार करता, पूराच्या काळात संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी नवसंजीवनी योजना अंतर्गत आवश्यक धान्य व औषधी उपलब्ध झाले का याबाबत जिल्हाधिकारी पंडा यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेने सजग राहण्याचे व पूरप्रवण ठिकाणी संभाव्य धोका निर्माण झाल्यास तातडीने वरिष्ठ प्रशासनाला कळविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मलेरिया प्रतिबंध व स्वच्छतेवर भर

पावसाळी कालावधीत मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. पावसाळ्यात ठिकठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर करून परिसराची स्वच्छता राखणे, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, ओलसर परिसरात डासांचे निर्मूलन करणे आदी बाबींचे काटेकोर पालन करण्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गाची पाहणी

धानोरा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या स्थितीकडे लक्ष वेधत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासंबंधात नागरिकांच्या तक्रारी असून महामार्गाची दुरूस्ती व यासंबंधातील समस्या सोडविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाद्वारे गडचिरोली येथे
किमान एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून केली.

आश्रमशाळांमधील सुविधांची तपासणी

जिल्हाधिकाऱ्यांनी धानोरा तालुक्यील सोडे येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या अभ्यास, पोषण आणि सुविधा याबाबत माहिती घेतली. तसेच अशा शाळांमध्ये नाविन्यपूर्ण काय उपक्रम राबविता येतील याविषयी चर्चा केली.

शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा व एकलव्य निवासी शाळेची पाहणी

या दौऱ्यादरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा गडचिरोली व सेमाना येथील एकलव्य निवासी शाळेचीही त्यांनी पाहणी केली. येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व निवासी सुविधांचा आढावा घेतला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना राबवण्याचे सांगितले.

00000