गाढवी नदीच्या पुलावरील कठडे तत्काळ लावा अन्यथा जन आंदोलन

168

युवारंग लोकहित संघर्ष संघटनेचा इशारा

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी : तालुक्यातील गडचिरोली -आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गाढवी नदीवरील पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत खितपत पडलेले आहेत.संबंधित जीर्ण कठडे बदलून तत्काळ नवीन कठडे संबंधित विभागाने तत्काळ लावावे अन्यथा युवारंग लोकहित संघर्ष संघटनेच्या वतीने भव्य जन आंदोलन करण्यात येईल असा खणखणीत इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गडचिरोली- आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील गाढवी नदीच्या पुलावरील कठडे मागील २ वर्षापासून तुटलेले आहेत. त्यामुळे कित्येकदा नदीच्या पुलावर अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच या महामार्गाच्या बाजूच्या परिसरात ठाणेगाव ,डोंगरगाव ,वनखी , वासाळा, किटाळी ,देऊळगाव, वैरागड, चामोर्शी,इंजेवारी या गावातील विद्यार्थी व शेतकरी बांधव या महामार्गाने दिवस -रात्र ये-जा करीत असतात .त्यामुळे या ठिकाणी पुन्हा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मागील २ वर्षापासून वृत्तपत्राच्या माध्यमातून संबंधित विभागाला कठडे दुरुस्ती करण्याची मागणी होत असून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आरमोरी येथील सुप्रसिद्ध नवरात्र महोत्सव लक्षात घेता येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे.त्यामुळे सदर पुलावरील कठडे त्वरित लावण्यात यावे अन्यथा दिनांक ८ ऑक्टोंबर २०२३ पासून युवारंग लोकहित संघर्ष संघटना ,आरमोरी तर्फे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आला आहे.

निवेदन देताना युवारंग लोकहित संघर्ष संघटना आरमोरीचे पदाधिकारी मनोज गेडाम, रोहित बावनकर, संजय वाकडे,रणजीत बनकर, राहुल जुआरे ,देवानन्द दुमाने ,विभाताई बोबाटे,आशाताई बोडणे, आशुतोष गिरडकर उपस्थित होते.