आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानचा अभिनव उपक्रम
बहुसंख्य मान्यवर व शालेय विद्यार्थी उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने संस्थानचे अध्यक्ष देवा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी येथील विवेकानंद विद्यालयात वृक्षारोपण करून पर्यावरण विषयक माहिती विशद करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्ष सुनिता तागवान होत्या.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य श्रीपाद वठे, विधायक दीपस्तंभ न्यूजचे संपादक विलास गोंदोळे, सहायक शिक्षक हरेष बावनकर,जीवन गणभोज,शुभदा बेदरे,कालीदास शेंडे, प्रिया अवचट, वनिता खोब्रागडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते विविध प्रजातींच्या वृक्षांची विधिवत पूजन करून रक्षाबंधन करण्यात आले.यावेळी वृक्ष संरक्षण, संवर्धन व जतनाची हमी घेत असल्याची शपथ विद्यार्थी, विद्यार्थिनी व उपस्थितांनी घेतली.
कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शक हरेष बावनकर यांनी वृक्ष व विज्ञान यांचा सहसंबंध याविषयी मत व्यक्त केले.तर प्राचार्य श्रीपाद वठे यांनी वृक्षारोपणाचे महत्व, वृक्षलागवड,हवा प्रदूषण,आॅक्सिजन, प्राणवायू यांचे महत्त्व आदींवर मार्मिक भाष्य केले.विधायकचे संपादक विलास गोंदोळे यांनी देशातील ७८.९२मिलीयन हेक्टर क्षेत्रफळ म्हणजे २४टक्के भाग हा वनाच्छाधित असल्याचे सांगत१९७२ चा वन्यजीव संरक्षण कायदा,१९७४चा पाणी प्रदूषण नियंत्रण कायदा,१९८०चा वन संरक्षण कायदा,१९८१चा हवा प्रदूषण नियंत्रण कायदा व १९८६चा पर्यावरण संरक्षण कायदा आदी बाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुनिता तागवान यांनी वृक्षरोपण, वृक्षलागवड व वृक्षमित्र होऊन वृक्षांची लागवड करावी.तसेच सर्वत्र वृक्षसंवर्धन करून वृक्षसंपदा वाढवावी असे आवाहन केले.याचवेळी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विविध प्रजातींचे रोपटे दिले व पुढील वर्षी आम्ही संस्थानचे पदाधिकारी वृक्ष बघायला आपल्या घरी येणार असल्याचे सुतोवाच केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून गडचिरोली जिल्हा शाखेच्या उपाध्यक्षा विद्या चौधरी यांनी संस्थानचे विविध समाजोपयोगी उपक्रम तसेच वृक्षारोपण, संवर्धन व जतन याबाबत विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गडचिरोली जिल्हा शाखेच्या सचिव संगीता रामटेके यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी,परिचारिका यांनी अथक परिश्रम घेतले.









