आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नागरिकांना अत्यावश्यक

131

विवेक नायडू यांचे प्रतिपादन

एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
देवळी(जिल्हा वर्धा):प्रगत राष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला आवश्यक आहे.कोणतीही आपत्ती सांगून येत नाही म्हणून येणाऱ्या आपत्ती करिता आपण सज्ज असले पाहिजे आणि याकरिताच प्रशिक्षण आवश्यक असते. लहान-सहान आपत्ती व्यवस्थापनाकरिता संरक्षण दल किंवा पोलीस दल यांच्यावर अवलंबून न राहता नागरिकांना आपत्तीला तोंड देण्याकरिता सज्ज असले पाहिजे. म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला आवश्यक आहे असे प्रतिपादन स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील एनसीसी मैदानावर आयोजित एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेला मार्गदर्शन करताना ‘यशदा’ पुणे चे मास्टर ट्रेनर विवेक नायडू यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना 17 फेब्रुवारी रोजी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे तर प्रमुख अतिथी म्हणून यशदा पुण्याचे मास्टर ट्रेनर विवेक नायडू, मास्टर ट्रेनर लखन गायकवाड, प्रहार समाज जागृती संस्थेचे सचिव संतोष तुरक, वसुंधरा वडतकर, राजश्री भारती, पत्रकार गणेश शेंडे व त्यांचे अधिकारी तथा प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन मोहन गुजरकर आदी उपस्थित होते.

सदर एकदिवसीय कार्यशाळेत स्थानिक एस एस एन जे महाविद्यालय, यशवंत कन्या विद्यालय व वर्धा येथील बजाज कृषी महाविद्यालय येथील ९६ तरुण-तरुणींनी भाग घेऊन प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू म्हणजे येत्या महाशिवरात्री यात्रेत गर्दी नियंत्रण, प्रथमोपचार, आग लागण्यापासून जंगलाची सुरक्षा, पर्यावरण संवर्धन व यात्रेकरूंमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वयंसेवकांना योग्य प्रशिक्षण देणे, हा होता. या अंतर्गत प्रथमोपचार, गर्दी नियंत्रणाबाबत योग्य मार्गदर्शन व लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता घ्यायची काळजी या विषयावर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

कॅप्टन मोहन गुजरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आवश्यक करण्यात यावे यावर जोर दिला तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे यांनी येत्या सत्रात सर्व महाविद्यालयातील इच्छुक तरुण-तरुणींना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा मानस आहे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

यावेळी अंडर ऑफिसर आदर्श नाईक सार्जंट मनोज नेहारे, हरिओम उईके, अभिषेक नेहारे, वेदांत कन्नाके, सुजल पराते, आदित्य तामगाडगे, अंडर ऑफिसर श्रद्धा मडावी, मनीषा मडकाम, रसिका बानकर, खुशु पचारे, कांचन राऊत व गिरीधर नेहारे आहे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

समारोपीय कार्यक्रमाचे संचालन सार्जंट कोमल शितळे व पायल चौके यांनी तर आभार प्रहार समाज जागृती संस्थेचे सचिव संतोष तुरक यांनी मानले.
——————————-