म.रा.कोतवाल संघटना तालुका आरमोरीचे पदाधिकारी व सदस्य करणार आंदोलन
२४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत होणार आंदोलन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या दिनांक २४ सप्टेंबर २०२४ ला गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका आरमोरीचे पदाधिकारी व सदस्य धरणे आंदोलन करणार असल्याचे संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल,पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आरमोरीचे तहसीलदार यांचे मार्फत कोतवाल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गोपाल ठवरे यांचे नेतृत्वात दिनांक २३ सप्टेंबरला निवेदन पाठविण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मंत्रालय स्तरावर कोतवाल संवर्गाची मुख्य मागणी म्हणजेच चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्याविषयी कार्यवाही चालू आहे. ती जलद गतीने पूर्ण होऊन आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता केवळ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना राज्यभर लक्षवेध आंदोलन करणार आहे.कोतवाल हे ऐतिहासिक पद असून कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा ही देखील खूप जुनी मागणी आहे. प्रत्येक पदाचे वेगळे महत्त्व असते;परंतु मानधनावर काम करणाऱ्या पदांमध्ये कोतवाल व इतर पदे यांच्या कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये खूप मोठी तफावत आहे.कोतवाल राज्याच्या तिजोरीत महसूल गोळा करून देण्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष सहाय्य करतो. निवडणूक प्रक्रियेच्या कामांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतो. तसेच महसूल प्रशासनात स्थानिक पातळीवरील नित्य नियमांची विविध कामे व क्षेत्रीय कामे इमाने इतबारे पार पाडत असतो.या बाबींचा शासन स्तरावर विचार होणे आवश्यक आहे.
राज्यातील कोतवाल संवर्गाची कुठेही शासनविरोधी भूमिका नसून केवळ शासन यांचे लक्ष वेधण्याच्या हेतूने हे आंदोलन करण्यात येणार आहे.त्यानुसार मंत्रालय स्तरावरील कोतवाल स्वर्गास व इतर मागण्या दिनांक 23 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण झाल्यास दिनांक 24 सप्टेंबर 2024 ला राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन, दिनांक 25 सप्टेंबर 2000 पासून राज्यभर काम बंद आंदोलन तसेच 26 सप्टेंबर 2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत राज्याध्यक्ष नामदेव शिंदे ,शिवप्रसाद देवणे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केले जाणार आहे. यात राज्यातील सर्व कोतवाल सहभागी होणार आहेत.
सदर आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यस्तरावर होत असलेल्या आंदोलनात आरमोरी तालुक्यातील सर्व कोतवालांनी सहभागी व्हावे व आंदोलन यशस्वी करावे असे कळकळीचे आवाहन राज्य उपाध्यक्ष गोपाल ठवरे यांनी केले आहे.
निवेदन देतेवेळी रणजीत कन्नाके, किशोर टेंभुर्णे, शिवराम कुमोटी, दीपक लिंगायत, योगेश कुमरे, खुशाल कुमरे, विनोद राऊत, जनार्दन पुसाम, रंजीत मोहदेकर, यशोदास ढवळे ,प्रकाश भोयर, ममता मडावी ,ज्योती कुमरे, अरुणा अल्लाम, रेखा खोडवे, कविता टेंभुर्णे ,प्रियंका गेडाम, कविता पिलारे ,संगीता उईके, संजीवनी झिले, निर्मला दुगा, निरंजना नैताम ,देवेंद्र टेंभुर्णे, गिरीधर सहारे, हेमचंद जांभुळकर आदी कोतवाल उपस्थित होते.









