बहुसंख्य गावकरी धडकले तहसील कार्यालयावर
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली)दि.२३ आॅगस्ट २०२४: तालुक्यातील रामाला (आरमोरी/शेगाव) गाव हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. तरीपण अजून पर्यंत रामाळा या गावाचे गावठाण मध्ये समावेश नाही.तसेच रामाळा गावाचा सिटीसर्वे अजून पर्यंत झालेला नाही.अशा विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रामाळावासीय जनतेने काॅंग्रेस व मनसे पक्षाच्या पुढारी वर्गाच्या नेतृत्वाखाली एकवटून तहसीलदार चौधरी मॅडम,तहसील कार्यालय आरमोरी यांच्यामार्फत मा.ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांना निवेदन पाठविले आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, रामाळा (आरमोरी/शेगाव)हा गाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. तरीपण रामाळा हे गाव गावठाण नाही. रामाळा गावाचा सिटी सर्वे आजपर्यंत झालेला नाही, रामाला गावातील नागरिकांना घराचे पट्टे देण्यात आले नाही, रामाला गावातील नागरिकांना घराचे मालकी हक्क देण्यात आले नाही, रामाला गावांचा सिटी सर्वे करून रामाला गावातील नागरिकांना आखीव पत्रिका देण्यात यावी, घराचे पट्टे देण्यात यावे, मालकी हक्क देण्यात यावी. तसेच आजपर्यंत खासदार, आमदार, शासकिय अधिकारी सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी, सर्वे ऑफिस शासकीय अधिकारी, नगर परिषद चे तत्कालीन पदाधिकारी, नगरपरिषदेमधील सर्व अधिकारी, रामाळा गावाकडे फिरकले सुद्धा नाही.रामाळा गावाकडे सतत दुर्लक्ष करत आले आहेत. त्यामुळे रामाळा हे गाव विकासापासून कोसो दूर राहिलेले आहे.तसेच रामाळा गावाचे सिटी सर्वे करून गावठाण करून, आखीव पत्रिका, घराचे पट्टे, स्वतंत्र मालकी हक्क तत्काळ देण्यात यावे,रामाळा गावाला कोणत्याही शासकीय योजना मिळत नाही. प्रधानमंत्री घरकुल आवास योजना, पाणी नळ योजना नाही, विद्युत व्यवस्थेचाही अभाव आहे. नगर परिषदेकडून घर कर आकारला जातो ;परंतु मूलभूत सुविधा मिळत नाही. त्यामुळे आरमोरी नगर परिषदेचा अविभाज्य घटक असलेल्या विभागातील नागरीक संतप्त झाले. संतप्त झालेल्या नागरिकांनी सदर समस्यांची संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा बेमुदत उपोषणाला बसणार किंवा येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचे अस्त्र उगारणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना गावातील प्रतिष्ठित नागरिक भगवान मंगरे, गिरधर सोमनकार, परशुराम रामटेके, अरुण दुधबडे, योगेंद्र चापले,आरमोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत बनकर, काँग्रेस शहराध्यक्ष अनिल किरमे, तसेच रामाळा गावातील नागरिक,लुकेश धोडरे, जयश्री सोमंनकार, अर्चना चापले, दीक्षा रामटेके, भावना चापले, जोशना रामटेके, मोनिका दुधबळे, मनीषा धोंडरे, जिजा सोमनकार, सुषमा नैताम, विनोद चापले, रवी नेवारे, अक्षय कांबळे, हिवराज चापले, शामराव सोमनकर, संदीप चापले, सुनील राऊत, राजु शेंद्रे व गावातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.









