जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि२७ सप्टेंबर : हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी कृषी विभागाने महाविस्तार AI हे अत्याधुनिक मोबाईल अॅप विकसित केले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. प्रिती हिरळकर यांनी या अॅपचा वापर करून शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
महाविस्तार AI अँपमध्ये अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वापरले असून, शेतकरी त्यांच्या पिकांचे फोटो अपलोड करून रोग व किडींचे निदान करून उपाययोजना मिळवू शकतात. अॅपमधील AI चॅटवॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देतो.
हवामान व बाजारपेठेची रिअल-टाइम माहिती
शेतकऱ्यांना पेरणी, कापणी आणि खत व्यवस्थापनाचे नियोजन करण्यासाठी स्थानिक पातळीवरील रिअल-टाइम हवामान अंदाज उपलब्ध आहे. तसेच स्थानिक व राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव तत्काळ पाहता येतात. यामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री करून अधिक नफा मिळवू शकतात.
कृषी योजनांची माहिती
या अॅपद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सर्व शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते. यामध्ये अनुदान, कर्जमाफी, विमा योजना यांचे तपशील दिलेले आहेत. मराठी भाषेतील माहितीमुळे ग्रामीण शेतकऱ्यांनाही अॅप सहज वापरता येते.
तज्ज्ञ सल्ला व व्हिडिओ मार्गदर्शन
अॅपमध्ये पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी आणि जैविक शेती याबाबत मराठीत मार्गदर्शक व्हिडिओ उपलब्ध आहेत. तज्ज्ञांचा सल्ला मोबाईलवर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळता येतो.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारे अॅप
महाविस्तार AI अॅपमुळे उत्पादन खर्चात बचत, उत्पन्नात वाढ, बाजारपेठेतील योग्य निर्णय क्षमता आणि हवामान बदलाशी सुसंगत शेती नियोजन या सर्व बाबी शेतकऱ्यांच्या हातात उपलब्ध होणार आहेत.
गुगल प्ले स्टोअरवरून महाविस्तार AI अॅप आजच डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा ! असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी सौ. प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
0000








