विधायक दीपस्तंभ…..
जनमत परिवर्तनाचा सोबती
आजच्या आधुनिक युगात सर्वत्र डिजिटल मिडीया, (सोशल मीडिया) समाज माध्यमे यांचा बोलबाला असताना व तसेच सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवर हजारो लाखो चॅनल कार्यरत असताना यात पुन्हा एका समाज माध्यमाची भर म्हणजेच विधायक दीपस्तंभची एन्ट्री….! एवढाचं विधायक दीपक स्तंभचा प्रवेश नाही. ‘विधायक दीपस्तंभ’ चा प्रारंभ हा मुळातच भारतातील राष्ट्र’ हा शब्द ‘महा’ मध्ये असलेल्या ‘महाराष्ट्र’ राज्यातील, विदर्भ भागातील, मागासबहुल व अतिसंवेदनशील जिल्हा असलेल्या गडचिरोली सारख्या जिल्ह्यातून होते.
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती ही लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याचा विभाजित करून 26 ऑगस्ट 1982 रोजी झाली. आज 2023 मध्ये गडचिरोली जिल्हा 42 वर्षाचा ‘तरुण तुर्क आणि विकासात गर्क’ असा होत आहे. सुरुवातीला जिल्ह्यामध्ये आठ तालुके होती. नंतर शासनाने प्रशासकीय दृष्टिकोनातून ७ आगस्ट १९९२मध्ये देसाईगंज हे उपविभाग निर्माण केले. तसेच कोरची, भामरागड ,मुलचेरा व देसाईगंज (वडसा ) या चार तहसील यांची निर्मिती झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये गडचिरोली, धानोरा, कोरची कुरखेडा देसाईगंज आरमोरी चामोर्शी, मुलचेरा,अहेरी, सिरोंचा ,भामरागड आणि एटापल्ली अशी 12 तालुके आहेत. या जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून ९० टक्के भूभाग जंगलव्याप्त आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त वनाच्छाधित म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. तसेच पुरम शहा राजाची राजधानी टिपागड, वैरागड ही प्राचीन किल्ले आहेत. तर वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनीवर हेमाडपंथी मंदिर,मार्कंडेश्वर देवस्थान आहे. त्याला विदर्भाची काशी म्हणूनही ओळखले जाते. जिल्ह्याच्या विविध भागात अधिक प्रमाणात गड , पहाडी ,डोंगर असल्यामुळे या जिल्ह्याला ‘गडचिरोली’ असे नाव प्रचलित झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१२ चौरस किलोमीटर असून सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही दहा लाख, एकाहत्तर हजार, 795 हून अधिक आहे. साक्षरतेचे प्रमाण 6.75 ,पर्जन्यमान १५० सेमी, घनता 67 प्रति चौरस किमी, हवामान उष्ण व कोरडे तर बारा पंचायत समित्या,४६७ ग्रामपंचायती व 51 अधिक जिल्हा परिषद क्षेत्र, शहर तीन, खेडे 1679, सहकारी संस्था 740 हून अधिक, शाळा, आरोग्य व्यवस्था जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.सुसज्ज संरक्षण व्यवस्था,आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर सुविधाही सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे शासनाच्या विकासपूर्तीच्या अग्रक्रमावर ‘आकांक्षीत जिल्हा’ म्हणून गडचिरोली जिल्हा समाविष्ट केलेला आहे. हे दखलपात्र आहे. त्यासाठी या जिल्ह्याला गेल्या काही शतकांपासून विकासाचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात बदल होत आहे. सद्यस्थितीत तर गडचिरोली जिल्ह्याची दखल राज्यकर्ते ही आता प्रामुख्याने घ्यायला लागले आहेत. अशातच विविध मुद्रित माध्यमाच्या वृत्तपत्रांची जिल्हा कार्यालय जिल्हा पुरवणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील कमी अधिक प्रमाणात बातम्या प्रकाशित करीत आहेत. परंतु काही भागात भौगोलिक परिस्थितीमुळे माध्यमे पोहचू शकत नाही. ज्याप्रमाणे सद्यस्थितीत जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, कोरची आधी तालुक्याच्या काही गावांमध्ये आजही वृत्तपत्र पोहोचत नाहीत. इंटरनेटच्या माध्यमांमुळे सोशल मीडियाचा सर्वत्र संचार होत आहे.ग्रामीण व दुर्गम भागात आजही रस्ते ,नद्या, नाले ,पायवाटा त्यांच्यामुळे ही वर्षातील पावसाळ्याचे मोसमात जवळपास दोन महिन्यापर्यंत संपर्क क्षेत्राबाहेर बरीच गावे असतात. अशावेळी आशेचा एक किरण म्हणून आंतरजालाचे माध्यमातून एक वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या कव्हरेज क्षेत्रांचा उपयोग व्हावा या दृष्टीने ‘विधायक दीपस्तंभ’ निर्माण करण्यात आले आहे. या माध्यमातून गोंडवाना ते दिल्ली पर्यंतच्या दुर्लक्षित भागातील गाव, खेडी, शहरे इतर बाबींच्या बातम्या घटना घडामोडी यांची माहितीही देता येईल. तसेच जिल्ह्यातील पोलीस भरती, जिल्हा परिषद, तलाठी भरती, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा न्यायालय भरती ,लिपिक, कृषी सेवक, वनरक्षक भरती, एसटी महामंडळ तसेच नागपूर, पुणे, मुंबई, दिल्ली पर्यंतच्या विविध आस्थापना, कंपनी, बोर्ड, मंडळे, विभाग यातील भरती विषयक माहिती ‘विधायक दीपस्तंभ’ च्या माध्यमातून ‘करियर जॉब्स’ गरजू पर्यंत पोहोचविण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन. ग्रामीण युवक युवतीच्या रोजगार चा टक्का वाढविण्यात खारीचा वाटा उचलेल यात शंका नाही.
‘विधायक दीपस्तंभ’ न्यूज मध्ये गाव ते जिल्हा ,विदर्भ ,राज्य देश, विदेश ,सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य विषयक ,कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, व्यवसाय, उद्योगधंदे, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ,वाहतूक, दळणवळण, संदेशवहन ,खाद्य भ्रमंती,मनोरंजन, फॅशन विश्व, क्राईम, विविध कला, उल्लेखनीय कार्य करणाऱे आदी विषय… तसेच दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वांच्या कार्याच्या यशोगाथा, लपलेल्या व्यथांच्या कथा, लहान मुलांचे विश्व व त्यांचे विविध पैलू (किड्स युनिव्हर्सल) मनो व्यापार ,वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन बदल, लोकल टू ग्लोबल होत असलेले ‘चेंज’ या संपूर्ण विविध अंगी, विविध ढंगी विश्वातील माहितीचे कण वेचून त्याची शुद्ध ,उपयोगी माहिती वाचकांना भविष्यात ‘दस्ताऐवज’ व्हावी; अशी माहिती देण्याचा सचोटी, प्रामाणिकपणा,व नि:स्वार्थ भावनेने *’विधायक दीपस्तंभ’* सदैव प्रयत्न करेल.
आजच्या या माहितीजालातील उपक्रमास आपल्यासारख्या सुज्ञ, तज्ञ, वाचक विश्वातील दिग्गजांचा भरभरून प्रतिसाद मिळेल.यात तिळमात्र शंका नाही. तसेच कुठे चुकले तर आपण आमच्या ईमेल, कॉमेंट बॉक्स, भ्रमणध्वनीवर सूचना, मार्गदर्शनही कराल हीच अपेक्षा बाळगतो. आपणा सर्वांच्या शुभ आशीर्वादासह एका नव्या प्रारंभासाठी…..!
संपादक आणि पत्रकारिता
मी सर्वप्रथमता 1995 -96 मध्ये इयत्ता नववीत असताना एका दैनिकाच्या तालुका प्रतिनिधींच्या ‘रायटर’ चा ‘रायटर’ म्हणून बातमी लेखनाचे काम करीत होतो. त्यावेळी माझे अक्षर सुबक व सुंदर असुन अचूक शुध्दलेखन आहे. असे त्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांच्या लेटरहेडवर लिहिलेली बातमी टाकून ते पाठवून द्यायचे व दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात कशी बातमी धडकत आहे. ते मला वाचायला सांगायचं..की आपण पाठवलेली बातमी दुसऱ्या दिवशी प्रकाशित होऊन हजारो वाचकांनी वाचन केलेली आहे. असे बातमी बद्दल जेव्हा चर्चेत सांगायचे; तेव्हा अप्रूप वाटत असे. त्यावेळी मी जेमतेम पंधरा वर्षाचा होतो. परंतु अभ्यासात उपजत हुशार असल्यामुळे मला लहानपणापासूनच वाचन, लेखन, चिंतन, मनन व नाविण्यपूर्ण बदल याची आवड होती.ती आजही कायम आहे.माझ्या शैक्षणिक कालखंडात इयत्ता १२वी नंतर काही कागदपत्रांच्या अभावामुळे डी.एड.ला प्रवेश मिळविता आला नाही.तर गडचिरोली जिल्ह्यातील ‘लाॅ ‘ काॅलेजचे गोंदिया जिल्ह्यात स्थानांतरण झाल्यामुळे तेही शिक्षण घेता आले नाही.२००१च्या पदवीनंतर काही कौटुंबिक व तांत्रिक कारणांमुळे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता आले नाही.अशा अडथळ्यांची शर्यत एकंदरीत माझ्या शैक्षणिक कालखंडात आली. नंतर परिस्थिती बदलली.मात्र सुटलेल्या शिक्षणाची गाडी रूळावर आणता आली नाही.याची सल मनात आजही कायम आहे.
मात्र, या या घटनांना कुरवाळीत न बसता मी 2001 पासून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला सुरुवात केली.यावेळी मनात असा विचार आला.आपल्या जीवनात असा काहीतरी ‘टर्निंग पॉईंट’ येईल राहिलेली स्वप्न पूर्ण होतील?..आज एका ध्यासाने पेटून उठलो आणि ‘झालं गेलं ते गंगेला’ म्हणून सोडून 2003 मध्ये एका कॉन्व्हेंट मध्ये तुटपुंज्या मानधनावर नोकरी करीत असताना मुद्रीत माध्यमाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावं अशी मनीषा बळावली. अन् तिथूनच माझ्यातील सुप्त पत्रकार जागृत झाला.अन् तोच माझा ‘टर्निंग पाईंट ‘ ठरला.त्याचवेळी (सन २००३ला) गडचिरोली जिल्ह्यात ‘दै.सकाळ’ ची गडचिरोली जिल्हा आवृत्तीला सुरुवात झाली होती.तेथे प्रथमतः बातमीदार म्हणून नियुक्ती झाली.त्यानंतर लगेचच तालुका प्रतिनिधी (आरमोरी तालुका)बढती मिळाली.प्रोत्साहनपर दर महिन्याला ३००रूपयाचा धनादेश मानधन म्हणून मिळत असे.दै.सकाळ मध्येच गत पाच वर्षांत ख-या अर्थानं माझी पत्रकारिता शिकली,चुकली,बहरली अन् नावलौकिकास पात्रही ठरली.नंतर दै.पुण्यनगरी मध्ये पाच वर्षे कार्य केले. दै.महासागर मध्ये २वर्षे, नागपूरच्या हिंदी साप्ताहिक ‘सेंट्रल टुडे’ मध्ये एक वर्षं,व सन २०१७ ते २०१९ या कालावधीत *दै.देशोन्नती*या जिल्हा आवृत्ती मध्ये उपसंपादक म्हणून काम केले.सन २००४मध्ये सर्व सामान्य माणसापर्यंत इंग्रजी माध्यमांचे शिक्षण झिरपावे म्हणून ‘युनिव्हर्सल काॅन्व्हेंट’ ची निर्मिती केली.ती जवळपास २०१५ या कालावधीपर्यंत चालविली.ज्ञानदान व माहितीचे कार्य अखंडपणे आजतागायत सुरू ठेवलेले आहे.मुद्रीत माध्यमातील वृत्तसेवा करतांना वृत्त संकलन, बातमी, प्रेस नोट, यशोगाथा, विविध जन समस्या, मागण्या,निवेदन व इतर विविध वृत्त संकलन करून संपादीत करणे या नित्यक्रमाची एक प्रकारे हातोटी गवसली आहे.त्यामुळे प्रासंगिक व विविध अनपेक्षित बदलांना हाताळण्याचे ज्ञान व कौशल्य अवगत झाले आहे.तसेच सततच्या जनसंपर्काच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, महिला -पुरुष ,युवा कार्यकर्ते आदींची जवळीक जनसंपर्क व लोक कल्याणकारी कार्य अव्यातपणे सुरू होते. हे सर्व सुरळीत असताना सन 2019 ते 2021 या ‘कोरोना’ कालखंडात पुन्हा मिठाचा खडा पडला. सततच्या लॉकडाऊनमुळे गडचिरोली- आरमोरी प्रवास थांबला. जिल्हा,तालुक्यातील विविध शासन,प्रशासनच्या कार्यालयाशी संपर्क तुटला. कोरोना कालखंड ही राष्ट्रीय विपत्ती असल्यामुळे सर्वत्र त्याचे दूरगामी परिणाम झाले.तसाच परिणाम माझेही रोजी रोटी व आवडत्या क्षेत्रावर झाला.
परंतु म्हणतात की, ‘संकटात संधी’ दडलेल्या असतात.’संकटे ही संधी’ घेऊनही येत असतात.(opportunity knocks the door) अशाप्रकारची एक नामी संधी या कोरोना कालखंडात माझ्या दरवाज्यावर चालून आली.असं म्हणणे वावगं ठरणार नाही.हा कालखंड अनुभवलेल्या सर्वांना माहीत आहेच की, सर्वत्र मानवी व्यवहार व आर्थिक वाहिनी बंद झालेली होती.मात्र, याचवेळी दुसरीकडे आँनलाईन व्यवहार, व्यापार, शिक्षण, पत्रकारिता, ब्लॉग, टीव्ही,संगणक,पाॅडकास्ट, वेबसाईट, न्यूज पोर्टल आदी ‘तंत्रज्ञान’ व ‘डिजिटल मिडीया’ ला भरती आलेली होती.या कालखंडात सर्वाधिक प्रमाणात सामान्य नागरिक, श्रोते,वाचक, दर्शक सोशल मीडियावरील व्हाट्सअप, फेसबुक,युट्युब, इन्स्टाग्राम,टेलीग्राम, विविध न्यूज पोर्टल,अॅपवर आपल्याला हवं ते शोधत होते;बघत होते.यातूनही सोशल मीडिया,न्यू मीडिया दिवसेंदिवस वाढत होता,फुलारत होता.विश्वासाहार्तेत वाढ करीत होता.हळूहळू अर्थकारणातही अग्रेसर होत होता.यात दिवसेंदिवस युट्यूबवर,इन्सफुलर,व्हिव्हर्स, सबस्क्राईब्रर्स,फालोअर्स आदींची संख्या वाढत होती.संबंध संपूर्ण कालखंडातील सोशल मीडिया वरील घौडदौड बघता आपणही मुद्रीत माध्यमाच्या जगातून थोडीसी उसंत घेऊन सोशल मीडियाच्या (समाज माध्यमाच्या) जगातील न्यूज पोर्टल, युट्युब आदी माध्यमांकडे वळावे व व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचक, श्रोते, दर्शक आदी पर्यंत पोहचावे.असा मानस केला.यातूनच पुढे माझ्या सोशल मिडियावरील पत्रकारितेच्या वर्ड प्रेस मधील न्यूज ब्लॉग व युट्युब वरील जनमत परिवर्तनाचा सोबती असलेल्या *’विधायक न्यूज ‘* चा जन्म झाला.
डिजिटल मीडिया अन् मी(संपादक)
सन २०२२च्या मे महिन्यात ‘वर्ड प्रेस’ या महाकाय न्यूज वेबसाईटच्या प्लेटफार्मवर ब्लॉग च्या माध्यमातून आरमोरी तालुका व गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय,सहकार, आरोग्य, अर्थ, शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान, फॅशन,कला, क्रीडा, साहित्य,संस्कृती, व्यवसाय, बाजारभाव, यशोगाथा, कविता व इतर विविधांगी स्वरूपाचे लेखन प्रारंभ केले.ते आजतागायत सुरू आहे.वर्डप्रेसने वेळोवेळी ‘बूमींग स्टेट्स ‘च्या माध्यमातून माझा आत्मविश्वास द्विगुणित केला.हळूहळू ३००पासून 10k हून अधिक वाचकसंख्या वाढत गेली.तर दुसरीकडे युट्युब वर समाजपयोगी, लोककल्याणकारी विविध विषयाच्या माध्यमातून विविध आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती, घटना, घडामोडी, लाईव्ह कव्हरेज ‘कव्हर’ करीत होतो.यातूनही व्हिव्हर्स चा ओढा ‘विधायक न्यूज’ कडे वाढण्यास एक प्रकारे मदतच झाली.तंत्रज्ञानाच्या वापरात आम्ही नवखे असल्याने काही चुकाही झाल्या.मात्र, प्रेक्षकवर्गाने आमचेकडे पाठ फिरवली नाही.उलट पुन्हा नवीन काय येणार आहे?,उद्याची बातमी आजच सांगा ना…!अशा प्रकारची आर्जवही केली जात आहे.पत्रकारितेत सर्वच काही आलबेल असते असं नाही.काही कुप्रवृत्ती, उपटसुंभ माध्यमातील माणसे चुका कुठे करतात.याची वाट बघतच असतात.मात्र,आपण संयम, सचोटी, प्रामाणिकपणा, प्रलोभनांना बळी न पडल्यास व सदसद्विवेकबुद्धीचा योग्य वापराचे पथ्य पाळल्यास त्यांचे मनसुबे फलद्रूप नक्कीच होतील.यात तिळमात्र शंका नाही.हे अनुभवांती सांगत आहे.
सोशल मिडियावरील पत्रकारितेत आता थोड्या फार प्रमाणात स्थिरावण्याची स्थिती निर्माण करीत आहे.अजुनही बराच पल्ला गाठायचा बाकी आहे.त्यासाठीच आता नव्या फार्मात, नव्या उमेदीने, नव्या जोमात, नव्या बदलांसह, स्वतंत्र, खंबीरपणे,आपणा सर्वांच्या सहकार्याने…..*’विधायक दीपस्तंभ’ न्यूजचे* विश्व उभारायचे आहे!
आपली प्रिय आरमोरी
गडचिरोली जिल्ह्यातील विविधतेने नटलेल्या समाजकारण, अर्थकारण, राजकारण व शिक्षण आदी क्षेत्रांवर प्रभाव टाकणारी, विविधांगी, अष्टपैलू व्यक्तिमत्वांची खाण असलेली, विदर्भात ‘दुर्गोत्सव’ सुप्रसिद्ध असलेली, दिवसेंदिवस विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला जात असलेली, वैनगंगा, गाढवी,खोब्रागडी इत्यादी नद्यांच्या पाण्याने परमपवित्र झालेली, कितीही वर्णन केले तरी शब्दांतून ओसंडून वाहणारी, राष्ट्रीय महामार्गावर वसलेली आपली प्रिय *आरमोरी*! आहे.
आरमोरी तालुका विस्ताराने अवाढव्य असून ९०गांवे आबादी व २०गांवे रिठी आहेत.सन २०११च्या जनगणनेनुसार ९०हजारांहून अधिक म्हणजेच आजमितीला लाखोंची जनसंख्या आहे.यातच फक्त आरमोरीची लोकसंख्या ३०हजारांहून अधिक आहे.आरमोरीत तहसील कार्यालय, दिवाणी व फौजदारी न्यायालय,नगरपरिषद, पोलीस ठाणे, वनपरिक्षेत्र कार्यालय, खरेदी विक्री सहायक निबंधक कार्यालय, कृषी कार्यालय, ट्रेझरी कार्यालय,पंचायत समिती,कोसा प्रकल्प संचालनालय, विविध नावारूपास आलेल्या शाळां,महाविद्यालय, आयटीआय, आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह,मंगल कार्यालय,सुसज्ज कचरा प्रक्रिया प्रकल्प, तालुका क्रीडा संकुल,छोटे छोटे प्रक्रिया उद्योग, व्यवसाय, बाजारपेठ,कृषी उत्पन्न बाजार समिती.भाजीपाला बाजारपेठ,जुनी गुजरी, व्यवसायिक लोकांची विविध दुकानें तसेच सर्व धर्मियांची मंदिर,मज्जीद,विहार,गिरजाघर, समाज मंदीर व इतर बाबींचा समावेश आहे.
येथील मुख्य व्यवसाय हा शेती व शेतीपूरक व्यवसाय तसेच छोटेखानी उद्यम हा आहे.आरमोरीकर रसिक वृत्तीचे, कष्टाळू, संयमी, उत्सवप्रिय, गुणवत्तेची कदर करणारे, गुण्यागोविंदाने राहणारी आहेत.
अशा परमपवित्र भुमीच्या मातीत माझा(संपादक) जन्म झाला, हे मी माझे व कुटुंबीयांचे अहोभाग्य समजतो आहे.याच आरमोरीतील सीताबर्डी परिसरातील मराठी शाळेपासून, उच्च माध्यमिक व महाविद्यालयां पर्यंत माझे शिक्षण झालेले आहे.या मातीच्या संस्कारातूनच समाज, संस्कृती, सामाजिक परिवर्तनाची विचारधारा, तत्वनिष्ठ ता, एकनिष्ठपणा, ताठरपणा, प्रासंगिक लवचिकता,समन्वय, सामाजिक समरसता,न्याय, बंधुता,सत्य, अहिंसा, प्रेम,मदत, सहकार्य, नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व आदी बाबींचा गुणसमुच्चय माझ्या जडणघडणीत भिनल्या आहेत.
भविष्यात आरमोरी ही अशीच विविधांगी, वैशिष्ट्यपूर्ण, आशयपूर्ण व एकमेवद्वितीय विधायक कार्याचा दीपस्तंभ होऊन, सर्वांना सुजलाम सुफलाम करीत प्रत्येकाला रोजगार, शिक्षण, आरोग्य व दिशा देणारी जीवनदायिनी ठरो!हीच ‘आपली प्रिय आरमोरी ‘कडून माफक अपेक्षा!
मी माझ्या पत्रप्रपंचाला जरी सुरूवात एकट्याने केली असली असे वरदर्शनी कितीही खरे वाटत असले.तरीपण माझ्या या यत्नात माझे वडील शेतीनिष्ठ शेतकरी, कर्तव्य कठोर व्यक्तिमत्त्व कैलासवासी काशिनाथजी गोंदोळे व दिवंगत माझी मातृवत्सल आई मुक्ताबाई काशिनाथ गोंदोळे यांनी धीर,संयम, प्रामाणिकपणा, अन्यायाविरुद्ध चीड,’सत्य परेशान हो सकता है,पराजीत नही’ अशी शिकवण दिली.ती पत्रकारितेत काल,आज व उद्याही बोधामृतासारखी रक्तात अन्् पेनाच्या शाईत ‘झुंजाररावा’ सारखी शेवटपर्यंत कायम राहील.सन २००९ ला ‘वडील’ नंतर २०१८ला ‘आई’ यांच्या देहावसानानंतर ,गेल्या १३वर्षापासून अनुकूल व प्रतिकूल अशा परिस्थितीत स्व- भावना,स्व- ईच्छांचा त्याग करून सतत दीपस्तंभासारखी खंबीर मनोबलाने उभी असलेली माझी पत्नी सौ.दिपलक्ष्मी, माझ्या कन्या कुमारी निवेदिका, कुमारी संस्कृती, तसेच माझ्या कुठल्याही कार्याचे सदैव टीकात्मक परिक्षण करणारे व सतत नाविण्यपूर्ण,उत्कृष्टतेचा ध्यास असलेले, स्वबळावर पीएचडी पर्यंतचे शिक्षण घेतलेले माझे मधले बंधू डॉ.दिपकराव गोंदोळे,धाकटे भाऊ किशोरराव,स्नुषा प्रियंका किशोर,त्यांचे चिरंजीव मानवेंद्र, विष्णू या कुटुंबातील सर्वांनी प्रथमपासूनच आजपर्यंत सदैव सहकार्य केले; प्रोत्साहन दिले.
तसेच ज्यांनी पुर्वीचे विधायक न्यूज व आताचे ‘विधायक दीपस्तंभ ‘ ला तंत्रज्ञान, व्हिडिओ निर्मिती कौशल्य, अधिक प्रभावी बातमी करण्यासाठी लागणारे ‘इफ्केट्स’ तसेच छोटे मोठे बदल यासांठी सदैव सहकार्य करणारे प्रा.दिनेश देशमुख, ‘विधायक’चा डोलारा सांभाळणारे तंत्रकुशल स्नेही लिलाधर मेश्राम, उत्कृष्ट छायाचित्रकार व व्हिडिओ एडिटिंग मध्ये निपुण असलेले पंकज इंदुरकर.त्याचप्रमाणे लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान करण्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व पत्रकारिता क्षेत्रातील तमाम मित्रमंडळी.तसेच या विधायक कार्यात मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणारे,ज्यांचा नामोल्लेख जरी करता आला नाही.मात्र माझ्या सदैव हद््यात असणारे शुभचिंतक, हितचिंतक, वाचक, दर्शक,प्रेक्षक आदींचे हद्यपूर्वक जाहीर आभार व्यक्त करतो.सहकार्याच्या अपेक्षेत!
बघत रहा,वाचत रहा फक्त विधायक दीपस्तंभ न्यूज