कवितासंग्रहात कवींनी उमटविले आहे जिवनाचे वास्तव
जेष्ठ रंगकर्मी,समिक्षक, प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर यांच्या हस्ते प्रकाशन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली दि.१३डिसेंबर२०२३: झाडीपट्टीतील जेष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे संपादित ‘रानगर्भ फुलत आहे’ या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे विमोचन गडचिरोली येथील आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थेच्या ‘ दलित मित्र स्व. लहूजी मडावी’ सभागृहात ज्येष्ठ रंगकर्मी व समिक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर यांच्याहस्ते थाटात पार पडले.
या प्रातिनिधिक कविता संग्रहातून जिवनाचे वास्तव उमटल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘ऊर्मी ‘ कार प्रभाकर तांडेकर हे होते.तर प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे यांनी पुस्तकावर भाष्य केले. विशेष अतिथी म्हणून आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष अािदवासी सेवक घनश्याम मडावी होते.
याप्रसंगी बोलताना ‘झाडीपट्टीतील ५६ प्रतिभावंतांना एकत्र आणण्याचे व त्यांच्या प्रतिभेला उजागर करण्याचे कार्य चुडाराम बल्हारपुरे यांनी प्रातिनिधिक कविता संग्रहाचे रूपाने अधोरेखित केले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.’ असे प्रतिपादन डॉ . श्याम मोहरकर यांनी केले. सोबतच त्यांनी ज्येष्ठ कविंच्या कविता व रानगर्भ फुलत आहे मधील कवींच्या कवितांचा आढावा घेतला.
प्रसंगाचे औचित्य साधून ३१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबाबत डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांचा सत्कार करण्यात आला. तर प्रा. डॉ. योगीराज नगराळे यांनी नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या साहित्याचे संशोधन करुन प्रबंध सादर केल्याने त्यांना आचार्य पदवी प्राप्त झाल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करुन नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘ऊर्मी’कार प्रभाकर तांडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ५६ कवींच्या कवितांचा आढावा घेऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. भाष्यकार प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी कवितासंग्रहावर भाष्य करतांना संग्रहातील विशेष उल्लेखनीय कवितांचे रसग्रहण केले. समिक्षक प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम यांनी कवितासंग्रहाचे समिक्षण करतांनाच त्यांचे कौतुकही केले.
याप्रसंगी नाट्यश्रीचे संगीतकार मारोती ऊईके, गायिका विजया पोगडे, केवळराम बगमारे, बाबा नक्षिणे यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.
प्रकाशन सोहळ्याचे संचालन योगेश गोहणे, प्रास्ताविक दिलीप मेश्राम यांनी केले. संपादकीय मनोगत नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी व आभार दादाजी चुधरी यांनी मानले.
मान्यवरांच्या अभिप्रायांचे वाचन प्रा. अरुण बुरे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. अरुण बुरे, वसंत चापले, दिलीप मेश्राम, पराग दडवे, राजु चिलगेलवार, राजेंद्र जरुरकर, गजानन गेडाम, चुडाराम बल्हारपुरे यांनी सहकार्य केले.
—————————————-
नाटयश्रीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना प्रेरणा- घनश्याम मडावी
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आदिवासी सेवक घनश्याम मडावी म्हणाले, नाटयश्री ही झाडीपट्टी रंगभूमीवरील चळवळ आहे. चुडाराम बल्लारपुरे यांनी नाट्यश्रीच्या माध्यमातून कलावंतांना एकसुत्रात गुंफतांना नाटक, कवितेच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य केले आहे. चुडाराम बल्हारपुरे लिखीत ‘बहुढंगी समाधीवाले बाबा’ या अंधश्रद्धेवरील नाटकाने नाट्यश्री ची ओळख झाडीपट्टीस झाली. त्यानंतर जत्रा घडली नागोबाची, महामृत्युंजय मार्कंडेश्वर, महापुजा अर्थात महासती सावित्री, नटसम्राट, मंगळसूत्र तोडू नकोस, ही नाटकं झाडीपट्टीत तुफान गाजलेली आहेत. झाडीपट्टी रंगभुमीची सेवा करतांनाच नाटयश्रीच्यावतीने साहित्यीक क्षेत्रातही केलेली कामगिरी लक्षणिय दिसुन येत आहे. अशा उपक्रमातून नवोदित व प्रतिभासंपन्न साहित्यीकांची समाजाचे साहित्य समाजापुढे येईल असेही घनश्याम मडावी म्हणाले.








