भारतीय युगधंरा महिला बचत गट आरमोरीचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली),दि.३ जानेवारी: येथील भारतीय युगधंरा महिला बचत गट व फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक ३ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन उत्साहात साजरी केली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बचतगटाच्या अध्यक्ष सौ.मिनाक्षी सेलोकर होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षिका सौ. कात्रटपवार व वक्त्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या, पर्यावरणवादी विद्या चौधरी होत्या.
सर्व प्रथमतः मान्यवरांनी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच बचत गटाच्या सभासदांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर आधारित रचलेल्या ओव्या, कविता व गाणी गायली.
याप्रसंगी विद्याताई चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.तर सौ.कात्रटपवार यांनी सावित्रीबाई फुले यांनी ज्योतीराव फुले यांच्या सहकार्याने सुरू केलेले विविध शैक्षणिक कार्य तसेच दर्जेदार शिक्षण याचा उंचावलेला आलेख मांडला.तसेच अध्यक्षीय भाषणात सौ.मिनाक्षी सेलोकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षशील जीवनाचा आदर्श ठेवून स्त्रियांनी स्वसंरक्षणासाठी व भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहनही केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन – सौ.रोशनी झिमटे यांनी केले.तर आभार -सौ. अनेका क्षिरसागर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.सिंधु कापकर, वैशाली दुमाने,दिपा गोंदोळे, प्रियंका गोंदोळे,शालू पोईनकर, सुनिता सोनकुसरे,संगीता माकडे, कविता गोंदोळे,रिशा मने,शैला सांगोळे,शितल कापकर,श्रीमती रीना दुमाने आदी बचतगटाच्या सदस्य महिलांनी उपस्थित राहून सहकार्य केले.








