विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.२२ डिसेंबरः जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिनांक 22.12.2025 च्या मध्यरात्री पासून ते दिनांक 05.01.2026 च्या मध्यरात्रीपर्यंत (15 दिवस) जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
दिनांक 25.12.2025 रोजी ख्रिसमस नाताळ व दिनांक 31.12.2025 रोजी नववर्षाचे आगमन उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) आणि (3) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या काळात शस्त्रे, स्फोटक पदार्थ किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बरोबर नेण्यास सक्त मनाई आहे. याव्यतिरिक्त, कोणतेही दाहक किंवा उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दर्शवणारे आवेशपूर्ण भाषण, घोषणा, चित्रे किंवा चिन्हे यांचे प्रदर्शन करण्यास बंदी आहे. विशेषतः, उपविभागीय दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मिरवणूक काढण्यास मनाई असून, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे सर्व प्रतिबंध संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी लागू राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.
0000








