शेतकरी योजना:पीक प्रमाणपत्र व प्रमाणित बियाणे वितरणासाठी तत्काळ अर्ज करा

115

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि. २६ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत खरीप हंगाम 2025-26 करिता राज्य शासनाच्या ‘महाडीबीटी पोर्टल’ वरील ‘शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पीक प्रमाणपत्र व प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर अर्ज 28 मे 2025 पर्यंत पोर्टलवर ऑनलाईन भरता येतील.त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी तत्काळ अर्ज करावेत व संबंधित योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

कृषी विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांत राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान (अन्नधान्य पीक) अंतर्गत भात, तूर, मूग आणि उडीद या पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज अनिवार्य आहे.

महत्त्वाच्या सूचनाः

अर्ज प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्वावर स्वीकारले जातील.

अर्जदार शेतकऱ्यांचे MAHADBT पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.

शेतकऱ्यांचे नाव 31 मार्च 2024 पूर्वी 7/12 उताऱ्यावर असणे आवश्यक आहे.

आर्थिक सहाय्य फक्त भात, तूर व मूग या पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण घटकातच मर्यादित आहे.

अर्ज भरताना बियाणे उत्पादक कंपन्यांकडून प्रमाणपत्र व पीक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

शासनाच्या निर्देशानुसार, शेतकऱ्यांनी आपली संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ अर्ज भरावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

0000