१९ मे रोजी महिला लोकशाही दिन

84

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१९: जिल्ह्यातील महिलांच्या विविध समस्या, अडचणी आणि गा-हाणी यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागाच्यावतीने दरमहा जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
त्यानुसार या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत, महिलांच्या विविध विभागांशी संबंधित वैयक्तिक तक्रारी, अडचणी आणि समस्या ऐकून घेतल्या जाणार असून, त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी महिलांनी आपल्या तक्रारीसंदर्भात सविस्तर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बेरेक क्रमांक १. खोली क्रमांक २६ कॉम्पलेक्स गडचिरोली येथे निःशुल्क उपलब्ध आहे. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात समाधान न मिळालेल्या तक्रारदार महिलांनी, आपल्या तालुकास्तरावरील अर्जाची प्रत व प्राप्त झालेला टोकन क्रमांकसह जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिनासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000