सामाजिक कार्यकर्त्यांनी इतिहासाचार्य मा.म.देशमुख यांना वाहिली शिवांजली

147

विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): पुरोगामी चळवळीचे नेतृत्व, इतिहास संशोधक,सतत सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लेखन, चिंतन, मनन करुन प्रबोधन करणारे नागपूर स्थित प्रा.मा.म.देशमुख यांचे निधन झाले.या दु:खद प्रसंगाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी बहुजन चळवळीचे मार्गदर्शक दिवंगत निळकंठराव दोनाडकर यांच्या निवासस्थानी दि.२३मार्चला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांचे उपस्थित भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक विजयकुमार ठवरे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार विलास गोंदोळे, श्रीमती निलिमा दोनाडकर,राजर्षी शाहू महाराज अभिनव कला अकॅडमीचे अध्यक्ष दौलतराव कुथे, वृक्षवल्ली संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने, पत्रकार रणजित बनकर,प्रा.भाग्यवान मेश्राम
आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना विजयकुमार ठवरे म्हणाले की, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचा विचार हा डोक्यावर घेऊन फिरायचा नाही तर डोक्यात घालून कृतीशील होणे गरजेचे आहे.तरच महापुरुष आणि त्यांच्या विचारांवर सदोदित कार्य करणारे खरे इतिहासाचार्य मा.म.देशमुख यांना श्रद्धांजली ठरेल.तसेच आरमोरी येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.त्याप्रसंगी त्यांनी तब्बल दीड तास प्रबोधन केले होते अशीही अविस्मरणीय क्षणाची आठवण त्यांनी सांगितली.पत्रकार विलास गोंदोळे यांनी त्यांचे लेखन, चिंतन, मनन, तसेच प्रबोधनकारी निर्भिड, संदर्भयुक्त वक्तव्य यावर भाष्य केले.
प्रा.प्रशांत दोनाडकर यांनी प्रा.देशमुख सरांच्या घरी गेले असतांनाचा पुस्तके खरेदीचा क्षण विशद केला.

कार्यक्रमाचे संचालन दौलतराव कुथे यांनी केले.तर आभार लिलाधर मेश्राम यांनी मानले.