आरमोरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

295

विविध महिला गटाच्या महिला एकवटल्या

जागतिक महिला दिनाच्या दिल्या शुभेच्छा!

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):भारतीय महिला फेडरेशन तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन आणि जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आरमोरी येथील गायत्रीनगर बर्डी येथे दिनांक १० मार्चला घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. वसुधा कोपूलवार व उद्घाटक म्हणून सौ गौरी जवंजालकर होत्या .तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. वंदना टिचकुले तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.महेश कोपुलवार होते.

यावेळी डॉ.कोपुलवार यांनी महिलांनी संघटित राहून कार्य करावे आणि महिलांनी चाळीशी नंतर आरोग्य कसे जपावे त्याबद्दल विशेष माहिती दिली. तसेच आजच्या परिस्थितीत महिलांनी सक्षम होणे आणि अन्यायाविरुद्ध एकत्रित येऊन लढा द्यावा असे मनोगत व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचे स्मरण केले.आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन जीवनक्रमण करावे असे आवाहनही यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय महिला फेडरेशनच्या सचिव सौ. मीनाक्षी सेलोकर यांनी केले.तर संचालन सौ वंदना शेंडे व आभार प्रदर्शन सौ शीतल कापकर यांनी केले.

यशस्वीतेसाठी आरमोरी येथील युगंधरा महिला बचत गट ,भारतीय महिला बचत गट, आनंदी महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी सक्रियपणे सहभागी होऊन अथक परिश्रम घेतले.