जिल्ह्यात हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद

156

पहिल्याच दिवशी १८३२१ लाभार्थिंनी हत्तीरोग विरोधी गोळ्या घेतल्या

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.१०: जिल्ह्यात आज हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.या मोहिमेला पहिल्या दिवशीच (दिनांक १०फेब्रुवारी २०२५ रोजी )१८,३२१ लाभार्थ्यांनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचे सेवन करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या 7 तालुक्यात हत्तीरोग आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून 100 टक्के पात्र नागरिकांना डी.ई.सी., अल्बेंडाझोल सोबतच आयवरमेक्टीन गोळ्या या तीन औषधांची मात्रा उंची व वयोगटानुसार देण्यात येत आहे.

सदर मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शासकीय विश्रामगृह येथे आमदार श्री मिलिंद नरोटे यांनी हत्तीरोग विरोधी गोळ्या घेऊन जनतेने मोहिमेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सचिन हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके उपस्थित होते.

वडसा येथे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थित आमदार रामदास मसराम यांनी सुद्धा हत्तीरोग विरोधी गोळ्या घेऊन जनतेस गोळ्या घेण्याचे आवाहन केले आहे.

 

तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वतः जिल्हाधिकारी श्री अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री सुहास गाडे यांनी हत्तीरोग विरोधी गोळ्या घेऊन मोहीम यशस्वी करणेसाठी आवाहन केले.

 

मोहिमेदरम्यान पात्र नागरिकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्याचे उद्दीष्ट आरोग्य विभागाने निर्धारित केले आहे. त्या अनुषंगाने 7 तालुक्यातील 7,22,423 पात्र लोकसंखेला हत्तीरोग दूरीकरण ओषधोपचार (IDA) मोहीमेदरम्यान प्रत्यक्ष औषधोपचार करण्यात येत आहे. त्याकरिता ग्राम पातळीवर 3109 कर्मचाऱ्यांची 1565 पथके गठीत करण्यात आलेली असून त्यांचे पर्यवेक्षणा करिता 313 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सोबतच गावपातळीवर मोहिमेकरिता लागणारी औषधे व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले.

मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जिल्हातील वृत्तसंकलनापर्यंत १८,३२१ इतक्या लाभार्थी हत्तीरोग विरोधी गोळ्या घेतल्या आहेत.हे विशेष!

0000