गाढवी नदीच्या पुलावर लागताहेत कठडे

300

*गाढवी नदीच्या पुलावर लागताहेत कठडे

युवारंगच्या दीर्घकालीन पाठपुराव्याला यश

विधायक दीपस्तंभच्या ब्रेकिंग न्यूजची घेतली दखल

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):नेहमी, क्रीडा आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवारंग संघटना आरमोरी तर्फे मागील २ वर्षांपासून गाढवी नदीच्या पुलावरील तुटलेले कठडे लावण्यासंदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी यांना व सार्वजनिक महामार्ग विभागाला निवेदन देण्यात आलेले होते. सदर गंभीर विषयाची दखल घेत सार्वजनिक महामार्ग विभागाने गाढवी नदीच्या पुलावरील कठड्यांच्या दुरस्तीचे कामाला २९ एप्रिल २०२४ ला सुरू केले आहे.

सदर महामार्ग हा अतिशय वर्दळीचा आहे.आरमोरी लगतच्या नदीघाटाजवळील व महामार्गावरील डोंगरगाव,ठाणेगाव, देऊळगाव तसेच वनखी,वासाळा,चामोर्शी व इतर ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, नोकरदार वर्ग यांना दैनंदिन येजा करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.तसेच गेल्या काही महिन्यापूर्वी या नदीपुलावरून ट्रक कोसळले होते.असा भिषण अपघातही झाला होता.तसेच भविष्यात अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.मात्र या बाबतीत संबंधित विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत होते.ही बाब युवारंग व सामाजिक कार्यकर्ते यांनी संबंधित प्रशासनाकडे जोरकसपणे लावून धरली.यात पाठपुराव्याला यश आले.अखेर सद्यस्थितीत प्रशासनाने या बाबीचे गांभीर्य ओळखून तुटलेले कठडे लावण्याचे काम सुरू केले आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

सदर काम सुरू झाल्याचे कळताच युवारंगचे प्रमुख राहुल जुआरे व संघटक पंकज इंदुरकर यांनी कामाची पाहणी केली व काही सूचना यावेळी केल्या.

———————————
पाठपुराव्याला यश; बातमीची घेतली दखल
गेल्या अनेक वर्षांपासून या नदीच्या पुलावरील कठडे तुटलेल्या अवस्थेत होते.या पुलावरून दररोज शेकडो चारचाकी, दुचाकी व सायकलस्वार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला व इतर पादचारी ये जा करीत असतात.सदर मार्ग हा जिल्हा मुख्यालयाकडे जाणारा असल्यामुळे या रस्त्यावरून विविध महत्त्वाच्या व अति महत्वाच्या व्यक्ती खाजगी, शासकीय वाहनाने प्रवास करीत असतात.मात्र या बाबीकडे सतत कानाडोळा केला जात आहे .अशी समज सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा रंग संघटनेची झाली.त्यामुळे युवारंगचे अध्यक्ष राहुल जुआरे, सामाजिक कार्यकर्ते रणजितदादा बनकर, विभाताई बोभाटे, आशुतोष गिरडकर, लिलाधर मेश्राम, पंकज इंदुरकर व महिला कार्यकर्त्यांनी विधायक दीपस्तंभ न्यूज शी संपर्क साधला.सदर बाबींचे गांभीर्य ओळखून विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांनी जनहितार्थ सदर बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ केली.युवारंग व सामाजिक कार्यकर्ते यांचा पाठपुरावा व विधायक दीपस्तंभ ‘न्यूजचा इम्पॅक्ट’ मुळे उशिरा का होईना अखेर तुटलेले कठडे लावण्याचे काम सुरू झाले आहे.हे विशेष!
_________________&______